पाली | सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी गीता पालरेचा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली ही संस्था गेल्या अनेक दशकांपासून रायगडसह नवी मुंबईत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहे.
शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी सन १९४१ मध्ये लावलेल्या या शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे रुपांतर आता वटवृक्षात झालेले आहे. शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांनी स्व.वसंतराव ओसवाल यांच्यावर त्या काळी अत्यंत विश्वासाने सोपवलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे व कर्तव्ये तत्परतेने पार पाडली.
आता वसंतराव ओसवाल यांच्या कन्या गीता पालरेचा यांच्या गळ्यात सु.ए.सो.च्या अध्यक्षपदाची माळ पडली आहे. रिक्त असलेल्या सुएसोच्या अध्यक्ष व सचिवपदासाठी रविवारी, २३ मार्च संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी गीता पालरेचायांची बहुमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
तर सचिवपदी ग.रा. म्हात्रे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. सु.ए.सो. पाली या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष कै.दादासाहेब लिमयेयांनी वसंत ओसवाल यांच्यावर सोपविलेली जबाबदारी त्यांनी जशी प्रामाणिकपणे सांभाळली, त्याचप्रमाणे मी संस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र लिमये यांच्या सोबतीने प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करण्याचा प्रयत्न करीन अशी ग्वाही गीता पालरेचा यांनी दिली.