ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल अखेरीस होणार ? मतदार याद्यांचे अद्यावतीकरण सुरु

जिल्हा परिषद निवडणुकांची रंगीत तालीम

By Raigad Times    26-Mar-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांची प्रतिक्षा संपणार आहे. जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम सुरु झाला असून प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यानंतर एप्रिलअखेर ग्रामपंचायतींचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.
 
डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांकडे जिल्हा परिषद निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहिले जाते. थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने सरपंचपदाची निवडणूक जिंकून ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्याचा मोठ्या राजकीय नेत्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका मागील काही वर्षांपासून रखडल्या आहेत.
 
त्यामुळे संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हाती आहे. एका प्रशासनाकडे किमान दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार असल्याने नागरिकांचाही खोळंबा होत आहे. ग्रामपंचायत निवडणुका कधी होणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्याने तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. जिल्ह्यातील अशा २२० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि १११ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मतदार याद्या अद्यावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीचे पडसाद
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा थेट संबंध येत नसला तरी ग्रामपंचायतींमध्ये आपल्याच पक्षाचे वर्चस्व असावे यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा सुरू असतो.सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक न लढवता स्थानिक विकास आघाड्या स्थापन करुन निवडणुका लढविण्याची शक्यता आहे.
 
२०१९ पूर्वी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र अलीकडच्या काळात शेकापला ओहोटी लागल्याचे चित्र आहे.
इच्छुकांची तयारी सुरु
गावाच्या विकासाची बहुतांश सूत्रे ही सरपंचाच्या हातात असल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभा निवडणुकीपासूनच याची इच्छुक उमेदवारांकडून पायाभरणी सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीत हार पत्करावी लागलेले उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने कामाला लागले आहेत.
 
त्याचबरोबर प्रशासकीय स्तरावरही निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमवण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील काही आकाराने मोठ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश असून सरपंचपदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.