सुधागड-पाली | वाढत्या शहरीकरणामुळे आणि हवामान बदलामुळे चिमण्यांसह इतर पक्ष्यांची संख्या चिंताजनक प्रमाणात घटत आहे. या पोर्शभूमीवर, कडायाच्या उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक संस्था, संघटना आणि नागरिक पुढाकार घेत आहेत. अनेक जण भूतदया दाखवताना दिसत आहेत.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुयातील वांगणी गावातील संकल्प मित्रमंडळ आणि उत्कर्ष मित्रमंडळ या दोन संस्था गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करत आहेत. ताम्हिणी घाट आणि भिसे खिंड येथेही पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी ठेवले जाते.
जलस्रोत कोरडे पडल्यावर पक्ष्यांसाठी हे पाणी संजीवनी ठरते. तर सुधागड तालुयातील जांभूळपाडा येथील पशुपक्षी प्रेमी सचिन मजेठिया हे गेली अनेक वर्षे मोकाट जनावरे आणि पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची व्यवस्था करत आहेत. त्यांनी दुकानाबाहेर छोटा हौद बनवून घेतला आहे, जिथे चिमणी, कावळे आणि इतर पक्षी दाण्यापाण्यासाठी येतात
पक्षांसाठी थंडगार पाणी
चिमणी आणि इतर पक्ष्यांसाठी थंडगार पाणी मिळावे यासाठी अनेकजण मातीची भांडी बनवून परसात आणि झाडांवर लावत आहेत. पालीतील हभप महेश पोंगडे महाराज, पुई-सिद्धेेशर येथील तरुण गणेश शिंदे, फणसवाडी येथील निलेश शिंगरे यांनी हा अनोखा उपक्रम राबविला आहे.
पालीतील अमित निंबाळकर यांनी आपल्या नर्सरीत आणि घराजवळ झाडांवर चिमण्यांसाठी घरटी बनवून पाण्याची व्यवस्था केली आहे.
चिमण्यांचे संवर्धन: काळाची गरज
गेल्या काही वर्षांत चिमण्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पर्यावरणातील बदल, मोबाईल टॉवर्समधून निघणारे रेडिएशन आणि झाडांची कत्तल यामुळे चिमण्यांचे अधिवास नष्ट होत आहेत.
या संदर्भात निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्थेने नागरिकांना पक्ष्यांसाठी पाणी आणि खाद्य ठेवण्याची सवय लावण्याचे आवाहन केले आहे.
चिमण्यांना सुरक्षित घर
पालीतील शंतनु लिमये या युवकाने मानवी वस्तीत येणार्या चिमण्यांसाठी निवारा आणि दाण्यापाण्याची व्यवस्था केली आहे. त्यांनी घराभोवती चिमण्यांसाठी खास घरटी बनवली आहेत, जिथे अनेक चिमण्या सहकुटुंब राहतात आणि प्रजनन करतात.