कर्जत | कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली धरणाचे परिसरातील २० गावातील शेतकर्यांनी आपल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले होते.साखळी उपोषणाच्या दुसर्या दिवशी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त यांच्या सर्व मागण्यांवर एका महिन्यात कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
तसेच धरणात सुरू असलेली बोटिंग आणि काम तात्काळ बंद करण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे. कर्जत नेरळ रेल्वे पट्ट्यात शेती ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यातआलेल्या पाली भुतिवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे, धरण तळोजा औद्योगिक वसाहती साठी विकले जाऊ नये तसेच पुनर्वसनाबाबत असलेले प्रश्न घेऊन स्थानिक शेतकर्यांनी पाली भुतिवली धरण प्रकल्पग्रस्त समितीचे माध्यमातून साखळी उपोषण सुरू केले होते. कर्जत येथील प्रशासकीय भवन कार्यालयाच्या बाहेर सुरू केलेल्या उपोषणाला धरणाचे पाणी जाणार्या लाभ क्षेत्रातील २० गावांमधील शेतकर्यांनी पाठिंबा दिला होता.
साखळी उपोषणाच्या दुसर्या दिवशी मंगळवारी (२५ मार्च) बाधित शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी मंगेश गायकर, सचिन गायकवाड, अॅड जयेंद्र कराळे, गोविंद पिरकड, सखाराम पिरकड, आत्माराम पवार हे शेतकरी उपोषणाला बसले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. दुपारी पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव आणि उप अभियंता संजीवकुमार शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
उपोषणकर्त्यांनी आपल्या ज्या नऊ मागण्या पाटबंधारे खात्यासमोर ठेवल्या होत्या, त्याची माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता कर्जत येथे आले होते. त्यावेळी उपोषणकर्ते यांच्यासह सूर्याजी बोराडे, अशोक तळपे, दशरथ शेंडे, विनोद भगत, राजेश गायकर, सुनील गोगटे, जयवंत कराळे, सुरेश बोराडे, ऋषिकेश भगत, नथुराम कराळे, राजेश गायकर, संतोष थोरवे, पोलिस मित्र संघटनेचे किशोर शितोळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
त्यावेळी उत्तम ठोंबरे, शेकापचे श्रीकांत आगीवले तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. शेतकरी आणि उपोषणकर्ते यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जाधव यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांवर पाटबंधारे विभाग कधी कार्यवाही करणार आहे याबाबत माहिती दिली.त्यात उपोषणकर्त्यांचे समाधान झाल्याने आपले साखळी उपोषण स्थगित केले, त्याचवेळी एक महिन्यात या मागण्या पूर्ण करण्यात पाटबंधारे विभाग अपयशी ठरले तर धरणाच्या जलाशयात जलसमाधी घेण्याचे निर्धार उपोषणकर्त्यांनी बोलून दाखवला आहे.
मात्र त्याआधी कार्यकारी अभियंता संजीव जाधव यांनी उपोषणकर्त्यांची पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद यांच्याशी फोन वरून संपर्क करून दिला. त्यात पुनर्वसन, धरणाचे काम बंद पाडणे,धरणावर झालेला खर्चाचा तपशील, धरणात सुरू असलेली बोटिंग बंद करणे आदी कामांना तत्काळ निर्णय दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले.
पाटबंधारे दिलेली लेखी आश्वासन कालव्यांसाठी एक महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल, बाधित शेतकर्यांना भू भाडे देण्यासाठी जल नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल, बंदिस्त नलिका द्वारे पाणी वितरण देण्याचे नियोजन, पाटबंधारे विभाग गावठाण क्षेत्र जाहीर करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव सादर करणार, एमआयडीसीला पाणी देण्यास विरोध असल्याची भूमिका शासनाकडे मांडणार, बुडीत क्षेत्रातील शेतकर्यांना जादा मोबदला देणेबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करणार, धरणाचे काम करीत असलेला ठेकेदार हा वर्षभरात केवळ एकच महिना काम करीत असल्याने ठेकेदाराचे काम बंद करण्यात येत आहे. नौका विहार बंद करण्याचे तत्काळ आदेश.