पनवेल | तळोजा देवीचा पाडा येथील २ वर्षीय मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह तिच्याच राहत्या घरातील बाथरुमच्या वर सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (२७ मार्च) समोर आला. या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात तळोजा पोलिसांनी यश आले आहे.
हार्षिक अमलेश शर्मा (वय २, रा. तळोजा देवीचा पाडा) असे मृत मुलीचे नाव असून ती मंगळवारी, २५ मार्चपासून बेपत्ता होती. मृत मुलगी तिच्या आई वडिलांसह देवीचा पाडा येथे राहत होती. ती मंगळवारी खेळण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी तळोजा पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, गुरुवारी तिचा मृतदेह राहत्या घरात बाथरूमवरील पोटमाळ्यावरील सुटकेसमध्ये सापडला.
पोट माळ्यावरून दुर्गंधी येऊ लागल्याने पाहणी केली असता मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला. तळोजा पोलीस व क्राईम ब्रँचने एकत्रितपणे तपास सुरू केला असता मुलीच्या घरासमोर राहणार्या मोहम्मद अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता भांडणातून व पैशांच्या हव्यासापोटी सदर गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली आहे.
मुलीची आई मुलीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर गेली असता मोहम्मद अन्सारीने तिला ठार मारुन सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस बाथरुमच्या वर ठेवली होती, अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. याबाबत पुढील तपास तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत करीत आहेत.