घर बांधण्याच्या ठेक्यावरुन वाद ! नानोशी गावात गोळीबार; एकाचा मृत्यू

हल्लेखोर सिडकोच्या घंटागाडीचा कामगार; घटनेनंतर फरार!

By Raigad Times    28-Mar-2025
Total Views |
panvel
 
पनवेल | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असणार्‍या नानोशी गावामध्ये गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. आदिवासी पाड्यावर ही घटना घडली असून मृत व्यक्तीचा नाहक बळी गेला आहे. हल्लेखोर हा सिडकोच्या घंटागाडीवर कामगार असून त्याला दारुचे व्यसन असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
त्याचबरोबर त्याच्या अरेरावीमुळे आजूबाजूचे लोकही त्रस्त होते. संबंधितावर पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून तो फरार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये नानोशी येथील आदिवासी पाड्यावरील काही जणांची जमीन गेल्यानंतर त्यांना कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी येथे भूखंड मिळाले आहेत. संबंधित जागा जवळपास सर्वांनीच बिल्डरला हे भूखंड विक्री करून नानोशी येथील आपल्याच भावकी आणि नात्यातील काही जणांची जमीन घेऊन त्या ठिकाणी घरे बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
 
त्यापैकी प्रभाकर वाघे उर्फ चिल्या हा तरुण याठिकाणी अरेरावी करत होता. तो सिडकोच्या घंटागाडीवर सफाई कामगार म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन असून तो सर्वांना त्रास देत होता. दरम्यान, या ठिकाणी बांधकाम करणे आणि त्याचबरोबर त्याकरिता आवश्यक असणारे साहित्य पुरविण्याच्या मुद्यावरुन वाद झाला. याच वादातून प्रभाकर वाघे उर्फ चिल्या याने एकावर आपल्याकडे असलेल्या बंदुकीतून गोळीबार केला.
 
ही बंदुकीची गोळी पाठीमागे उभ्या असलेल्या बाबू वाघमारे या बिगारी कामगाराला लागली आणि यात त्याचा मृत्यू झाला. मृत बाबू वाघमारे हा देखील त्या ठिकाणचा रहिवासी आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती समजताच पनवेल शहर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनाकरीता पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. अशाप्रकारे राजरोसपणे गोळीबार करून एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यामुळे नानोशी आदिवासी वाडीवर हळहळ व्यक्त करण्यात आली.
 
फायरिंग करणारा प्रभाकर वाघे उर्फ चिल्या लगेच फरार झाला आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा आला कसा? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याचा अर्थ पनवेल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्र बाळगणार्‍यांचे प्रमाण वाढले असल्याची एकंदरीत माहिती प्राप्त झाली आहे. पनवेल शहर पोलिसांनी पथक तयार करून हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे. त्याच्याशी संबंधित असणारे आणि कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली असल्याचे समजते.
हल्लेखोर ‘चिल्या’ची परिसरात दहशत
हल्लेखोर चिल्या हा या परिसरामध्ये दादागिरी करत होता. अरेरावी करणार्‍या चिल्याची या परिसरामध्ये दहशत होती. तो सातत्याने सर्वांना त्रास देत होता. त्याचबरोबर जीवे ठार मारण्याची धमकीसुद्धा कायम देत असे.
 
विशेष म्हणजे त्याला घंटागाडीवर कामासाठी ठेवण्यात आले होते. शेवटी त्याने आपल्याच वाडीवरील एकाचा जीव घेतला. त्याच्यावर किती गुन्हे त्या अगोदर दाखल आहेत? याची माहिती मिळाली नसली तरी तो सर्वांना आपल्या दबावाखाली ठेवत असल्याची माहिती प्राप्त झाली.