गुरे चोरी करताना चौघांना पकडले ! पोलादपूर पोलिसांची धडक कारवाई, ३ बैलांची सुटका

By Raigad Times    28-Mar-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | चरायला सोडलेली गुरे चोरी करणार्‍या टोळीला पोलादपूर पोलिसांनी गजाआड केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घेरारसाळगड भागातील गुरे चरत चरत रायगड जिल्ह्यातील ओंबळी भागातील जंगलात आली. त्यापैकी तीन बैलांची चोरी करणार्‍या चौघांना पोलादपूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
 
पोलादपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद तुकाराम गायकर (रा. घेरारसाळगड गवळवाडी, ता.खेड) यांचे ३ बैल चरत चरत ओंबळी गावातील जंगलात आले होते. हे बैल चोरण्याच्या प्रयत्नात असताना, मासूम अजीम तालघरकर (वय- २४ रा. शिरवली ता.महाड), मुरशद उस्मान कोर्डे कर (वय ६२ रा. शिरवली, ता.महाड), मुकेश पांडुरंग सकपाळ (वय- ४० रा. शिरवली ता. महाड), शब्बीर उस्मान जोगिलकर (वय ३८ रा.कापडे बु. ता.पोलादपूर) यांना ओंबळीच्या जंगलामध्ये रंगेहाथ पकडण्यात आले.
 
या चौघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल जाधव व तपासिक अंमलदार पोलीस हवालदार सुतार व सहकारी यांनी या धडक मोहिमेत महत्वपूर्ण साथ दिली.