अलिबागजवळ अपघात; बामणोली येथील तरुणाचा मृत्यू

29 Mar 2025 13:26:12
 alibag
 
अलिबाग | अलिबाग शहराला लागून असलेल्या चेंढरे येथील बाह्यवळण मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर घडक होऊन झालेल्या अपघातात बामणोली येथील दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला. मिथील रमेश सुतार असे त्याचे नाव आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 
बामणोली येथील मिथील सुतार बाह्यवळण रस्त्याने कुरूळच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून निघाला असता समोरून चुकीच्या लेनवरून येणार्‍या दुचाकीने त्याच्या गाडीला धडक दिली. या अपघातात मिथील गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अलिबागच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
 
याप्रकरणी दुचाकीस्वार संदीप अनंत म्हात्रे (रा.भुते, ता.अलिबाग) याच्याविरूद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपघातानंतर जिल्हा रूग्णालयात मिथीलचे नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संध्याकाळी बामणोली येथील स्मशानभूमीत मिथीलच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0