चार मंत्र्यांची किल्ले रायगडला भेट , केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा

By Raigad Times    29-Mar-2025
Total Views |
 mahad
 
महाड | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १२ एप्रिल रोजी किल्ले रायगडवर येणार आहेत. शिव पुण्यतिथी कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. त्यांच्या या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, २८ मार्च रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी किल्ले रायगडला भेट देऊन पाहणी केली.
 
यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते. किल्ले रायगडवर हेलिकॉप्टर उतरणार नसल्याने, ना.अमित शहा हे पायी चालत रायगड किल्ला पाहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्रीगणांनी किल्ले रायगडची पाहणी करित प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या.
 
त्यानंतर ते माध्यमांशी बोलले. वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा जा विषय झाला आहे, त्याबाबत संभाजी राजे छत्रपती आणि इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्या चर्चेचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेतील असे ना. शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संवर्धनाच्या कामासंदर्भात बैठक
रायगड संवर्धनाच्या कामाबाबत त्यांनी भाष्य केले. संवर्धनाचे काम करताना अनेक अडचणी येतात हे मान्य करत झालेले काम ब बेदखल करण्यासारखे नाही. मात्र या कामांत सुधारणा आणि गती येणे आवश्यक आहे. लवकरच आपण या कामांसंदर्भात एक बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची किल्ले रायगड भेट, किल्ले रायगडावरील संवर्धनाच्या कामात येणार्‍या समस्या आणि अडचणींवर मार्ग काढणारी ठरेल असा विश्वास ना. चंद्रकांत पाटील यांनी यावेळेस व्यक्त केला. २००४ नंतर किल्ले रायगडवर हेलिकॉप्टर उतरविणे बंद करण्यात आले आहे.
 
त्यामुळे ना. अमित शहा यांचे हेलिकॉप्टर किल्ले रायगडवर उतरवण्यात येणार नाही. पायी फिरूनच ते गडदर्शन करतील असे त्यांनी स्पष्ट केले. वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात प्रश्न विचारला असता, राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे कोणतेही वाद काढू नयेत ही विनंती मी हात जोडून करतो. वाटल्यास साष्टांग दंडवत घालण्यासही मी तयार आहे, असे ते म्हणाले.