रोहा हादरला! शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना... शिक्षकाने केला ६ विद्यार्थिनींचा विनयभंग

चणेरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील प्रकार; पालक संतप्त

By Raigad Times    29-Mar-2025
Total Views |
roha
 
धाटाव | रोहा तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. चणेरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील अनिल कुंभार या शिक्षकाने शाळेतील ६ अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करत, शिक्षक अनिल कुंभार याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे रोहा तालुका हादरला असून, पालकांमधून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 
रोहा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २४ मार्च रोजी सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. पीडित विद्यार्थिनी वर्गात शिकत असताना शिक्षक अनिल कुंभार याने त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करुन त्यांचा विनयभंग केल्याची तक्रार या ६ विद्यार्थिनींनी केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करूनअनिल कुंभार याला अटक करण्यात आली आहे.
 
या प्रकरणाचा रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक खतीब यांच्यासह सहकारी वर्ग तपास करीत आहेत. या घटनेबाबत शिक्षक कुंभार याच्याविरोधात पुरेसे पुरावे गोळा केले जात असून, त्याआधारे लवकरच कायदेशीर पावले उचलली जातील, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोक्सो कायद्याची कलमे लावण्यात आली आहेत. एकंदरीत ६ विद्यार्थिनींवर शाळेत घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पालकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत असून, शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.