महाड | किल्ले रायगडावर वर्षभरात होणारे विविध उत्सव व कार्यक्रमासाठी होणारी अलोट गर्दी त्यासाठी असणार्या पोलीस बंदोबस्तासाठी बाहेरुन येणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना ‘किल्ले रायगड’ची माहिती व्हावी, यासाठी महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाने ‘किल्ले रायगड’ची भव्य प्रतिकृती तयार करुन घेतली आहे.
किल्ले रायगडवर बंदोबस्तासाठी बाहेरुन येणार्या पोलीस, अधिकारी आणि कर्मचार्यांना किल्ले रायगडची माहिती करुन घेण्यासाठी ही प्रतिकृती उपयुक्त ठरेल, असा विेशास महाडचे उपविभागिय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् मधून कलाशिक्षण घेतलेल्या मिरज (जि. सांगली) येथील शिल्पसंकल्प आर्टचे शिल्पकार अमोल सूर्यवंशी आणि रसिका लाटणे या दोघांनी दहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही प्रतिकृती साकारली आहे.
ही प्रतिकृती पंधरा फूट लांब, आठ फूट रुंद आणि चार फूट उंचीची आहे. किल्ले रायगडचा डोंगर आणि गडावरील वास्तू आणि ठिकाणे या प्रतिकृतीमध्ये अत्यंत बारकाईने साकारण्यात आले आहेत. ही प्रतिकृती आधी मातीचा साचा तयार करून नंतर प्लॅस्टीकचा वापर करुन बनविण्यात आली आहे. प्रतिकृतीचे विविध भाग सुटे करून पुन्हा जोडता येत असल्याने ही प्रतिकृती कुठेही हलविता येणे शय आहे.
प्रतिकृतीसाठी वापरण्यात आलेले प्लॅस्टीक मजबूत असल्याने अनेक वर्षे ही प्रतिकृती टिकणार आहे. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी बुधवारी सायंकाळी नवीन पोलीस वसाहतीमधील कम्युनिटी हॉलमध्ये या प्रतिकृतीची माहिती पत्रकारांना दिली. किल्ले रायगडवर बाहेरुन येणार्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना किल्ले रायगड परिसराची आणि गडावरील ठिकाणांची माहिती नसते.
त्यामुळे त्यांना गडावर कोणते ठिकाण बंदोबस्तासाठी नेमून दिले आहे? याची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाच्या दोन चार दिवस आधी स्थानिक कर्मचारी बरोबर घेऊन त्यांना आपले बंदोबस्ताचे ठिकाण आणि त्या ठिकाणची आपली जबाबदारी समजून घ्यावी लागते. आता ती सर्व माहिती या पोलिसांचा महाड किंवा गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे असलेल्या पोलीस चौकीत या पोलीस कर्मचार्यांना देता येणार आहे.
त्यामुळे गडावर जाऊन माहिती घेणे, परत येऊन पुन्हा गडावर जाण्याचा वेळ वाचणार आहे. किल्ले रायगडची ही प्रतिकृती तयार करण्यासाठी सात लाख रुपये खर्च आला. त्यासाठी महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांनी आर्थिक सहकार्य केल्याचे शंकर काळे यांनी सांगितले. गडावर कार्यक्रम नसताना ही प्रतिकृती पाचाड पोलीस चौकीत ठेवायची, महाडमध्ये ठेवायची की अलिबाग येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या आवारात ठेवायची? याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही आजवर अनेक शिल्पे बनवली; पण एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती आम्ही प्रथमच बनवित होतो. हे काम आव्हानात्मक होते. मात्र डीवायएसपी शंकर काळे आणि पोलिसांनी किल्ले रायगडच्या भौगोलिक आणि नैसर्गिक बारकावे आम्हाला तपशीलवार उपलब्ध करुन दिले. प्रसंगी ड्रोनचाही वापर करुन तपशील उपलब्ध करुन दिला. त्यामुळे ही प्रतिकृती साकारणे सोपे गेले. शिल्पकार म्हणून काम करताना एक वेगळा आणि चांगला अनुभव आम्ही घेतला. - अमोल सूर्यवंशी शिल्पकार, मिरज, जि. सांगली.