पनवेल | पोलिस दलात असल्याचे खोटे भासवून लग्न जुळवून घेतले. त्यानतर सासूचे १२ तोळे दागिनेही खासगी सावकाराकडे गहाण ठेवून पती, सासू आणि सासरा यांनी फसवणूक केल्याची फिर्याद विवाहितेने कळंबोली पोलिस ठाण्यात केली आहे. आरोपी हे सातारा जिल्ह्यातील कोरेगावच्या बिचुकले तालुयातील आहेत.
सध्या त्यांचे वास्तव्य कळंबोलीत आहे. तक्रारदार विवाहितेचा पती राहुल रामचंद्र सपकाळ, सासरे रामचंद्र आंनदराव सपकाळ आणि सासू सुवर्णा रामचंद्र सपकाळ यांनी २०२१ पासून पीडितेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय तिच्या आईचे साडेपाच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने राहुल सपकाळ याच्याकडे विेशासाने ठेवण्यासाठी दिले असता त्याने ते खासगी सावकाराकडे गहाण टाकले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याप्रकरणी हुंड्यासाठी छळ, आर्थिक फसवणूक, शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय डफळ हे तपास करीत आहेत.