म्हसळा | म्हसळा तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तालुक्यातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात याव, अशी मागणी तहसीलदार सचिन खाडे व पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्याकडे करण्यात आली. अवजड वाहतूक सुरू असल्याने भयंकर अपघात वाढत चालले आहेत. स्थानिक नागरिकांच्या व पर्यटकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
श्रीवर्धनवरून येणारी बेकायदेशीर मायनिंगची अवजड वाहतूक मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहे. अशी हीसर्व अवजड वाहतूक बंद झाली नाही तर युवासेना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी माजी सभापती रवींद्र लाड, तालुकाप्रमुख सुरेश कुडेकर, युवासेना तालुका अधिकारी कौस्तुभ करडे, शहरप्रमुख विशाल सायकर, तालुका संघटक कृष्णा म्हात्रे, महिला तालुका प्रमुख रीमा महामुनकर, निशा पाटील, उपतालुकाप्रमुख हेमंत नाक्ती, विभागप्रमुख गणू बारे, नदीम दफेदार अन्य मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.