जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे उद्या भूमिपूजन ! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती

04 Mar 2025 14:08:09
 alibag
 
अलिबाग | अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला नवीन सात मजली इमारतीचे भूमिपूजन बुधवारी, ५ मार्च रोजी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. तिनशे खाटांचे अद्ययावत असे हे रुग्णालय असणार आहे. यासाठी साडेसुमारे चारशे कोटी खर्च अपेक्षित आहे.
 
अलिबाग येथे बुधवारी संध्याकाळी चार वाजता होणार्‍या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मंत्री अदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले, खा. श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, खासदार धैर्यशील पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेंद्र थोरवे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. विक्रांत पाटील, आ. रविंद्र पाटील, आ. महेश बालदी आणि आ. महेंद्र दळवी उपस्थिती असणार आहे. रायगड जिल्हा रुग्णालयाची आंतररुग्ण विभागाची इमारत जीर्ण झाली होती.
 
दरवर्षी करोडो रुपयांचा निधी खर्च करुनही या इमारतीची पडझड सुरूच होती. ही बाब लक्षात घेऊन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी नवी इमारत उभारण्यात यावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते. नवीन इमारतीचे बांधकाम खर्चिक बाब असल्याने त्याबाबत ठोस निर्णय होत नव्हता. मात्र रायगडकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारतीच्या बांधकामाला मंजूरी दिली आहे.
 
२ लाख चौरस फुटांची सात मजल्यांची सुसज्ज इमारत बांधली जाणार आहे. ३०० खाटांच्या या नवीन इमारतीसाठी पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असणार आहे. केंद्राच्या नियमानुसार पब्लिक हेल्थ सेंटरच्या मान्यतेनुसार खाजगी पद्धतीचे अद्ययावत असे बांधकाम केले जाणार आहे. ज्यात २० खाटांचा अतिदक्षता विभाग, १६ खाटांचे नवजात बालक उपचार कक्ष आणि २० खाटांचे डायलेसिस युनिट याचा समावेश असणार आहे.
 
अपघात विभागासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया कक्षही उभारला जाणार आहे. इमारतीत पाच अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह शस्त्रक्रिया कक्षही बांधले जाणार आहेत. याशिवाय लॉड्री, पाककक्ष, क्ष किरण कक्ष, चार लिफ्ट, दोन जिने, एक रॅम्प अशी सुविधा इमारतीमध्ये असणार आहे. त्यामुळे नागरिकांना अद्ययावत असे जिल्हा रुग्णालय मिळणार आहे.
रायगड जिल्हा रुग्णालयाला नवी इमारत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सरकारने मंजूरी दिल्यानंतर बुधवारी नव्या इमारत बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. माझ्यासाठी हि अत्यंत आनंदाची बाब असून, या इमारतीचे काम वेळेत पुर्ण होऊन लवकरच जनतेसाठी उपलब्ध होईल असा मला विश्वास आहे. - आमदार महेंद्र दळवी, अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघ
Powered By Sangraha 9.0