रांजणखार-डावली ग्रामस्थांचा हंडा मोचा

04 Mar 2025 18:54:50
 alibag
 
अलिबाग | तालुक्यातील रांजणखार- डावली येथील महिलांनी सोमवारी (३ मार्च) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश हंडा मोर्चा काढला. स्थानिक नागरिक पाण्यासाठी वणवण करत असताना, धनदांडगे, उद्योगपतींच्या बंगल्यांना भदाभदा पाणी येते कुठून? असा सवाल मोर्चेकर्‍यांनी उपस्थित केला. खारेपाटातील अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. याबाबत शासनाला अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत.
 
मात्र पाण्याचा प्रश्न अद्यापपर्यंत सुटलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी हा मोर्चा काढला. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.किशन जावळे गावकर्‍यांना सामोरे गेले. त्यांनी म्हणणे ऐकून घेतले. मात्र गावकर्‍यांचे समाधान न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत आमच्या गावाला पाणी मिळत नाही, तोपर्यंत इथून कुठेही हलणार नाही असा पवित्रा या गावकर्‍यांनी घेतला.
 
यावेळी मोठा पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता. वारंवार निवेदन देऊनही सरकार काही करत नाही. आता फक्त उरले आत्मदहन करणे, जीव घालवणे असे सांगत पिण्याच्या पाण्यासाठी जर सरकार लक्ष देत नसेल तर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही अशा इशाराही देण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0