कार घुसली एसटीत; २ ठार , ३ जण जखमी; कारचा चुराडा होऊन मृतदेह अडकले!

ताम्हिणी घाटात भीषण अपघात...

By Raigad Times    05-Mar-2025
Total Views |
pali
 
पाली/बेणसे | ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलिकडे मंगळवारी (४ मार्च) दुपारी एसटी आणि कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीनजण जखमी झाले आहेत. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.खेड - चिंचवड ही एसटी पुण्याच्या दिशेने निघाली होती. तर स्विफ्ट कार माणगाव तालुक्यातील विळे गावाच्या दिशेने येत होती.
 
उतारावर भरधाव वेगात निघालेल्या या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने, कार समोरुन येणार्‍या एसटीला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये स्विफ्ट कारचा चालकाच्या बाजूचा भाग बसमध्ये घुसून पूर्ण चेपला गेला. त्यामुळे कारचालक व चालकाच्या पाठीमागे बसलेली जेष्ठ महिला यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही मृतदेह कारमध्येच अडकून पडले. सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्यांनी घटनास्थळी जाऊन आधुनिक साधनांच्या मदतीने दुपारी ३ वाजता अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले.
 
कारमधील अन्य तीन जखमींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये एका लहान मुलीचादेखील समावेश आहे. तर एसटीमधील कोणीही जखमी झाले नाही. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी मुळशी तालुक्यातील शिंदेवाडी येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची नावे अद्याप समोर आली नाहीत. मात्र ते मूळचे ओडिसा राज्यातील असल्याचे समजते.
 
अपघाताची माहिती मिळताच विळे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड व पोलीस विनोद तांदळे घटनास्थळी पोहोचले. येथील तुषार कदम आणि राकेश दगडे यांनीदेखील घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरु केले. माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोर्‍हाडे व पोलीस कर्मचारी हेदेखील रेस्क्यू टीम सोबत घटनास्थळी पोहचत मदतकार्य सुरु करण्यात आले.