मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ नवीन बोगद्यात ट्रक पेटला...

05 Mar 2025 17:05:45
 khopoli
 
खोपोली | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिट नवीन बोगद्यामध्ये सोमवारी (३ मार्च) रात्रीच्या सुमारास लोखंडी केबल वाहून नेणार्‍या ट्रकला अचानक आग लागली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली; मात्र ट्रकचे टायर, केबिन जळून खाक झाली.
 
ट्रकला आग लागल्याची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स आणि खोपोली नगर पालिका अग्निशमन दल यांनी घटनास्थळी पोहचून जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविले व आग विझवून अपघातग्रस्त ट्रक घटनास्थळावरून क्रेनच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र अपघातग्रस्त ट्रक हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
 
या आगीमुळे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अंधारात काहीच दिसत नव्हते. बोगद्यातील इतर वाहनातील प्रवाशांना श्वसनास त्रास जाणवल्याने त्यांना बोगद्याच्या बाहेर काढण्यात आले होते. मुंबईकडे जाणारी वाहतूक संपूर्णपणे खोळंबली होती. हीच घटना जर बोगद्याच्या मध्यभागी अर्थात आत घडली असती तर परिस्थिती अजून भयानक असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्वच यंत्रणांनी आग विझविण्यासोबत इतर वाहनांतील प्रवाशांना धुरापासून श्वसनास त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Powered By Sangraha 9.0