अलिबाग | रायगड जिल्ह्यातील व नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनामार्फत सर्वो तोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. सामान्य रुग्णालयाच्या सात मजली ३०० खाटांच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते बुधवारी (५ मार्च) झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जत आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, आरोग्य विभागाचे उपसंचालक अशोक नांदापुरकर, डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे उपस्थित होते.
यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. जिल्हा रुग्णालयाची इमारत उत्कृष्ट आणि दर्जेदार होण्यासाठी यंत्रणानी दक्ष रहावे. या इमारतीच्या बांधकामात कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही, अशा सूचनाही बिटकर यांनी दिल्या. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, तत्कालीन पालकमंत्री या नात्याने या कामाची मंजुरी आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे समाधान असल्याचे सांगितले.
या रुग्णालयाचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करावे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी आ.महेंद्र दळवी यांना सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी, ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना जिल्ह्यातच सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. आ.महेंद्र दळवी यांनी, जिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्यसरकारच्या उच्चाधिकार समितीने एकूण साडे चारशे कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
२ लाख चौरस फुटाची सात मजल्यांची सुसज्ज इमारत बांधली जाणार असून ३०० खाटांच्या या नवीन इमारती साठी पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निशिकांत पाटील यांनी प्रास्तविक केले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शीतल जोशी घुगे यांनी आभार व्यक्त केले.