महाड आगाराच्या ताफ्यात येणार ४० नव्या बसेस , रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

01 Apr 2025 18:49:53
mahad
 
महाड | महाड परिवहन आगाराला देण्यात आलेल्या पाच नवीन बसेसचे सोमवारी (३१ मार्च) रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ना. गोगावले यांनी महाड आगाराला ४० नव्या बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
 
यावेळी महाडचे आगार व्यवस्थापक फुलपगारे, वरिष्ठ अधिकारी शिवाजी जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ता नितीन पावले, तालुकाप्रमुख रवींद्र तरडे, शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, महाड शहर संपर्क प्रमुख सिध्देश पाटेकर, शहर संघटक निखिल शिंदे, जिल्हा लिगल सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. सनी जाधव, मनोज काळीजकर उपस्थित होते. बसेसच्या लोकार्पणानंतर माध्यमांशी बोलताना, आज उपलब्ध करुन देण्यात आलेल्या लालपरी बसेस ग्रामीण आणि दुर्गम डोंगराळ भागात प्रवासी सेवा देण्यासाठी उपयुक्त असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
 
महाड आगारातील शिवशाही बसेस वारंवार नादुरूस्त होतात याकडे ना. गोगावले यांचे लक्ष वेधले असता, महाड आगाराला नव्या शिवशाही बसेस उपलब्ध करुन देण्यात येतील असे सांगतानाच, महाडचे नवे स्थानक मे महिन्यापर्यंत सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लोकार्पणनंतर एका नव्या बसमधून प्रवासही ना.गोगावले यांनी केला.
Powered By Sangraha 9.0