जिल्ह्यातील रक्तदाब, मधुमेह रुग्णांना मोफत औषधे! रायगड जिल्हा परिषदेची महत्वाकांक्षी योजना

जल्ह्यातील ५५ हजार ४४६ रुग्णांनी केली नोंद ; औषधांचा एन.सी.डी किटचे वाटप सुरु

By Raigad Times    01-Apr-2025
Total Views |
alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांना मोफत ओषधे मिळणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेकडून १०० दिवसांचा महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून आतापर्यंत रक्तदाब व मधुमेहाच्या ५५ हजार ४४६ रुग्णांनी नोंदणी केली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली आहे.
 
मुख्यमंत्री यांनी १०० दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत डॉ. भरत बास्टेवाड यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजना राबवली जाणार आहे. योजनेंतर्गत रुग्णांना ३ महिन्यांचा आवश्यक औषधांचा एन.सी.डी. कीट मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सोमवार (दि.३१) पासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
 
रुग्णांना एन.सी.डी. कीट उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत रुग्णांना एन.सी.डी. कीटचे वाटप करण्यात आले.
 
रायगड जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ३४ हजार २०० आहे. रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागात ५५ प्राथमिक आरोग्य केंद्र, २८० उपकेंद्र, ७ जिल्हा परिषद दवाखाने, ३ प्राथमिक आरोग्य पथके कार्यरत आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उच्चरक्तदाब, मधुमेह आजारावरील औषधे देण्यात येतात. उपलब्धतेनुसार रुग्णांना औषधे देण्यात येत असल्याने, ही औषधे संपल्यानंतर दुर्गम भागातील काही रुग्णांना सतत आरोग्य केंद्रात येऊन औषधे नेणे अडचणीचे ठरते. यामुळे हे रुग्ण औषधांपासून वंचित राहून त्यांना इतर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.
 
त्यामुळे जिल्हा परिषद सेस फंडातून नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह रुग्णांना एका वेळी तीन महिने पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील उच्च रक्तदाबाच्या ३४ हजार ०४७ तर मधुमेहाचे २१ हजार ३९९ रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. रुग्णांना औषधांचे कीट सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.