रत्नागिरी | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणार्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी रेल्वे स्थानकात वातानुकुलित विशेष अतिथी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते सोमवारी (१ एप्रिल) करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरीचे रेल्वे स्थानक विमानतळापेक्षा सुंदर बनले आहे. एमआयडीसीने ४० कोटी दिले आहेत.
शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागानेही निधी दिला आहे. प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा होत आहेत. मात्र, सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणखी पाच दहा कोटी निधी लागला तरीही एमआयडीसीमार्फत दिला जाईल. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकणातील रेल्वे स्थानके चांगली बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे.