मुरुड | रेवदंडा पूल ते कोर्लई, बोर्ली या दोन प्रमुख रस्त्यांचे भूमिपूजन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. २९.४० किमीच्या या रस्त्यासाठी १३९ कोटी ४८ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत रस्ते काँक्रीटचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. काँक्रीटचे रस्ते हे दीर्घ काळ टिकणारे असून मुरुड तालुक्यातील जनतेची रस्ते समस्या कायमस्वरुपी निकाली निघणार आहे.
रस्ते मजबूत व दीर्घ काळ टिकणारे बनवल्यामुळे मुरुड तालुक्यात पर्यटनवृद्धी होईल असा विश्वास आ. दळवी यांनी केले यावेळी साळाव ते तळेखार त्याचप्रमाणे नागाव व अन्य भागात काँक्रिट रस्ते व रुंदीकरणासाठी १७१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्याचेदेखील भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दिलीप भिंगे, मुख्य व्यवस्थापक दिलीप वर्गीस, मुरुड तालुका बांधकाम सेना अध्यक्ष दिनेश मिनमीने, शिवसेनेचे जिल्हा उप प्रमुख भरत बेलोसे, अलिबाग तालुका प्रमुख अनंत गोंधळी, रमेश गायकर, शिवसेनेचे नेते भाई सुर्वे, तालुका उपप्रमुख भगीरथ पाटील, बोरली ग्रामपंचायत सरपंच स्वप्ना जायपाटील, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे, नियोजन मंडळ सदस्य नीलेश घाटवळ, मुरुड तालुका संघटक यशवंत पाटील, युवक नेते अमोल लाड , राजू रंजन, सी.एम. ठाकूर, मनोज कमाने, माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते आदी उपस्थित होते.
रेवस ते रेवदंडा या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून लवकरच या रस्त्याचे टेंडरसुद्धा निघणार आहे. माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी मला दोन वेळा आमदार म्हणून निवडून दिले आहे, त्याबद्दल मी जनतेचा ऋणी आहे. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन आपल्याला जिल्हा परिषद व नगरपरिषदा निवडणूक लढवायच्या आहेत. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे लोकप्रतिनिधी निवडून येत असतात.
माझ्यापेक्षा विकास कामांची तळमळ माझ्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे पुढील काळातही विकास कामांचा झंझावत असाच सुरू राहणार आहे, असे आ. दळवी यांनी म्हटले आहे. कोस्टल रोडमुळे जमिनीचे भाव वाढणार असून स्थानिकांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होणार असल्याचे यावेळी आ. दळवी त्यांनी सांगितले.