अलिबाग | जिल्ह्यातील श्रीवर्धन, अलिबागसह काही अन्य भागात मंगळवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते. तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू आणि सफेद कांदा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पहायला मिळत आहे. मच्छिमारदेखील संकटात सापडण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने उकाडा वाढू लागला आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणामुळे पाऊस कुठल्याही क्षणी पडण्याची शक्यता वाटत होती. दरम्यान, जिल्ह्यात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होऊ लागले आहेत.
मार्चपूर्वीच तापमानाचा पारा पहिल्यांदाच ३८ अंश सेल्सिअसवर गेला होता. त्यानंतर पुन्हा सकाळी आणि रात्री गारवा तर मध्येच मळभ आणि अधूनमधून पावसाचा शिडकावा असे वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे या वातावरणामुळे सर्दी, ताप, घशाचे संसर्ग, पित्त आदी आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. रायगडात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडेल की काय, असे वाटत होते.
दक्षिण भागात सोमवारी संध्याकाळी आकाश अभ्राच्छादीत होते. जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आठवडाभर वातावरणही ढगाळ राहणार आहे. त्यामुळे उकाड्यातही कमालीची वाढ झाली आहे. वार्याचा जोर असल्याने मासेमारीदेखील अडचणीत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मच्छिमारांसमोर संकट उभे आहे.
पांढरा कांदा उत्पादक अडचणीत?
अलिबाग तालुक्याच्या खंडाळे, नेहुली परीसरात सध्या पांढर्या कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शेवटच्या काढणीचा कांदा शेतकरयांनी शेतातच वाळत ठेवला होता. मात्र हा कांदा पावसाने भिजला आहे.
यामुळे कांद्याची पात कुजल्याने ती वि णीला येणार नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. आज सकाळपासूनच कांदा उलथवणीचे काम शेतकरयांनी हाती घेतले होते. मात्र दिवसभर मळभ असल्याने कांदा अपेक्षित वाळला नाही.