तळोजातून १८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त , कोयनावेळे येथील अहमद मोटलानी याला केले अटक

07 Apr 2025 19:21:44
 panvel
 
पनवेल | तालुयातील कोयनावेळे गावातील अरिहंत अनायका गृहनिर्माण सोसायटीत राहणार्‍या अहमद मोटलानी याच्याकडून १८ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा पांढर्‍या रंगाचा मेफेड्रॉन नावाचा अंमली पदार्थ गुन्हे शाखेने जप्त करून त्याला अटक केली आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ट पोलीस निरीक्षक संदीप निगळे यांनी तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्या सहकार्याने कोयनावेळे गावात धाड टाकली.
 
अंमली पदार्थ विक्रेता अहमद फारुख मोटलानी राहत असलेल्या अरिहंत अनायका गृहनिर्माण सोसायटीतील चौथ्या मजल्यावरील ४०६ मध्ये पोलिसांनी घुसून छापा टाकला. त्यावेळी मेफेड्रॉन नावाचा पांढर्‍या रंगाचा अंमली पदार्थ आढळून आला. बाजारात त्याची किंमत १८ लाख ४५ हजार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
 
या कारवाई दरम्यान मोटलानीला पोलिसांनी ताब्यात घेवून अटक केली. त्यांना नुरी रिक्षावाला (रा. मुंब्रा) हा मोटलानीचा या धंद्यातील साथीदार हवा आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, फिर्यादी पोलीस नाईक संजय प्रल्हाद फुलकर आणि सहकार्‍यांनी छाप्यात सहभाग घेतला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0