त्याने दिला आसरा, तिने काढला काटा... प्रेमी युगूलाकडून चालकाची हत्या

08 Apr 2025 18:37:08
 panvel
 
पनवेल | ...ती नोकरीच्या शोधात नवी मुंबईत आली होती. ना नोकरी, ना घर अशी तिची अवस्था होती. तिच्या मदतीला एक ओला चालक आला. रहायला घर दिले, नोकरीचंही बघू असे सांगत तिला निश्चिंत केले. तिने मात्र बॉयफे्ंरडला बोलावले. तिघांमध्ये वाद झाला आणि या वादातून त्या चालकाची हत्या झाली.
 
मृत सुरेंद्र पांडे हा मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील प्रयागराज येथील रहिवासी होता. सध्या तो उलवे सेक्टर-२४ मधील मोहागाव येथील क्रियांश रेसीडेन्सी इमारतीत एकटाच राहत होता. महिन्याभरापूर्वी सुरेंद्र पांडे याची रिया सरकल्याणसिंग हिच्यासोबत ओळख झाली होती.
 
मुळची पंजाब राज्यातील रिया ही नोकरीच्या शोधात असल्याने सुरेंद्र पांडे याने तिला आपल्या घरामध्ये आसरा दिला होता. तेव्हापासून रिया सुरेंद्र पांडे याच्या घरामध्ये राहत होती. चार दिवसांनंतर रियाने संगमनेर येथे राहणार्‍या विशाल शिंदे या तिच्या प्रियकराला उलवे येथील घरी बोलावून घेतले होते. यानंतर विशाल शिंदे हासुद्धा रियासोबत सदर घरात राहु लागला. २ एप्रिल रोजी सुरेंद्र पांडे याचे रिया, विशाल यांच्यासोबत भांडण झाले.
 
या भांडणात रिया आणि विशाल या दोघांनी सुरेंद्र पांडे याच्या डोक्यात हातोड्याने हल्ला करुन त्याची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी त्याचा मृतदेह चादरीत बांधून ठेवला आणि त्याच्या घराला बाहेरुन टाळे लावून त्याची वॅगनार कार घेऊन पळ काढला होता. ते दोघे थेट संगमनेर येथे विशालच्या घरी पोहोचले आणि याची माहिती त्यांनी घरच्यांना दिली.
 
विशालच्या घरच्यांनी त्यांना पोलिसांत हजर होण्याचा सल्ला दिल्यानंतर ते स्वत: संगमनेर पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी सुरेंद्र पांडे याच्या हत्येची कबुली दिली. दरम्यान, सुरेंद्र पांडे शरीरसुखाची मागणी करत असल्याने हत्या केल्याचे दोघांनी सांगितल्याची प्राथमिक माहिती तपासाअंती समोर आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0