खोपोलीमध्ये मास्क न लावणार्‍यांवर कारवाईचा बडगा

0
372
खोपोल नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे बाजारपेठ, मटण मार्केट येथे सामाजिक अंतर पाळण्याबाबत जनजागृती करताना छायाचित्रात दिसत आहेत.
  • कोरोना लढाईत हरण्याची वेळ येऊ देऊ नका!
  • मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांचे खोपोलीकरांना भावनिक आवाहन

संदीप ओव्हाळ /खोपोली : खोपोली नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी चार दिवसांपूर्वी पदभार स्वीकारत मास्क न लावणार्‍या तसेच सामाजिक अंतर न पाळणार्‍या व्यापारी, नागरिकांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रशासनाचे नियम पाळा, कोरोनाच्या या लढाईत हरण्याची वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी खोपोलीकरांना केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार, खोपोली नगरपालिका हद्दीत कोरोनाला रोखण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तीन पथके तयार करुन भाजी मार्केट, मटण-मच्छी मार्केट तसेच बाजारपेठेत सकाळी 6.30 वाजल्यापासून धडक कारवाई सुरु केली जात असल्याने व्यापार्‍यांंसह खोपोलीकरांनी चांगला धसका घेतला आहे. कोरोनाच्या दृष्टीने काळजी घ्या, प्रशासनाचे नियम पाळा. नाहीतर कोरोना लढाईत हरण्याची वेळ येऊ देऊ नका. आपल्यासाठी तसेच कुटुंबासाठी तरी सतर्क रहा, असे भावनिक आवाहन करतानाच, काही जणांवर नाईलास्तव कारवाई करणे भाग पडत असल्याचे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी म्हटले आहे.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्यावर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिल्याने जिल्हाधिकार्‍यांंच्या आदेशाने भणगे यांनी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मास्क वापरणार्‍यांंची संख्या 99 टक्क्यांवर आली आहे. यामध्ये मच्छी मार्केट, भाजी मंडई, बाजारपेठ, शास्त्री नगर, शिळफाटा, ताकई परिसरात मुख्याधिकारी स्वतः पथकासोबत मास्क लावा, सामाजिक अंतर पाळा यासंबंधी जनजागृती करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here