अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना कोरोनाची लागण

0
16764

सोशल माध्यमातून स्वतःच दिली माहिती

आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, केले नागरिकांना आवाहन

अलिबाग : अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोव्हीड-19 चाचणी गुरुवारी (9 जुलै) पॉझिटीव्ह आली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतःच सोशल माध्यमातून दिली आहे. पुढील उपचारासाठी दाखल होण्याआधी, अलिबागकरांना “आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांना दोन दिवसांपासून ताप येत होता. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली होती. गुरुवारी या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. पुढील उपचारासाठी त्यांना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तशी माहिती नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सोशल माध्यमातून दिली आहे.

“आपल्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत. आपण सर्वांनीही आपली व आपल्या घरच्यांची काळजी घ्या” असे आवाहनही प्रशांत नाईक यांनी अलिबागकरांना केले आहे. दरम्यान, आपल्याला कोरोना झाल्याचे स्वतःच जाहीर करणारे नाईक हे जिल्ह्यातील दुसरे व्यक्ती आहेत. याआधी माजी आमदार सुरेश लाड यांनी त्यांना कोरोना झाल्याचे स्वतःच सांगितले होते. कोरोनाविरोधातील लढाईच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची आणि सकारात्मक बाब आहे. याद्वारे या आजाराला सामोरे जाण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांनाही बळ मिळणार असून, कोरोना रुग्णांकडे बघण्याचा सामाजिक दृष्टीकोनही बदलण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here