रेशनच्या तांदळाचा काळाबाजार! पनवेल पोलिसांचा छापा

0
2889
  • पळस्पे येथील गोदामातून 110 टन तांदूळ हस्तगत

  • सोलापूर बार्शी येथून रेशनचा माल आणल्याचे उघड

  • पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई

नाना करंजुले/पनवेल : कोरोनाच्या वैश्विक संकटात रेशनिंगवरील धान्याचा मोठा काळाबाजार होत असल्याचे पनवेल पोलिसांनी शुक्रवारी (31 जुलै) उघडकीस आणले. पळस्पे येथील एका गोदामात सोलापूर बार्शी येथून आणलेला 110 टन रेशनचा तांदूळ पोलीस आणि महसूल यंत्रणेने जप्त केला आहे. परिमंडळ-2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. या पाठीमागे बडे धेंड असण्याची शक्यता असून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ येऊ नये, म्हणून केंद्र सरकारने आवश्यक ते अन्नधान्य रेशन दुकानात उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. ते अत्यल्प दरात तर काहींना मोफत वितरीत केले जाते. मात्र या रेशनिंगमध्ये मोठा काळाबाजार होत असल्याने लाभार्थींना अन्नधान्य मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हाधिकार्‍यांपासून ते तहसीलदार या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई केली जात आहे. असे असतानाही रेशनिंगच्या धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार केला जात असल्याचे पनवेल येथील पळस्पे परिसरात उघडकीस आले आहे.

टेक केअर लॉजिस्टिकमधील पलक या गोदामात शासनाकडून कोविड काळात गोरगरिबांना वाटण्यासाठी जे अन्नधान्य पाठविण्यात आले होते, त्याचा काळाबाजार करून बेकायदेशीररित्या साठवणूक होत असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस आयुक्त संजयकुमार, सहआयुक्त राजकुमार व्हटकर आणि अशोक दुधे यांच्या आदेशानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल पोलिसांच्या पथकाने महसूल प्रतिनिधींना सोबत घेऊन शुक्रवारी धाड मारली. तेव्हा बार्शी सोलापूर येथून चार कंटेनरद्वारे रेशनचा तांदूळ साठा करण्यासाठी आणल्याचे उघड झाले.

याप्रकरणी भीमाशंकर रंगनाथ खाडे, इक्बाल काझी, लक्ष्मण चंद्र पटेल यांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी खाडे याच्यावर ठाणे भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या कारवाईत 33 लाख 8 हजार इतक्या किमतीचा रेशनिंग तांदूळ जप्त करण्यात आला आहे. 50 किलो वजनाच्या 2 हजार 220 गोण्या या ठिकाणी आढळून आल्या. अशियन राईस, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ हरियाणा असा नामोल्लेख असलेल्या गोण त्याचबरोबर दोन इलेक्ट्रॉनिक काटे या ठिकाणी आढळून आले.

या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने, नितीन वाघमारे, पंकज पवार, गणेश चौधरी, मंडळ अधिकारी संतोष पाटील, पुरवठा लेखा अव्वल कारकून अर्चना राऊत, तलाठी तेजस तवर यांचा समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश राजपूत करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here