रायगडात 15 जुलैपासून पूर्ण लॉकडाऊन

0
45975
  • पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती
  • कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय

अलिबाग : रायगडात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर, जिल्ह्यात 15 जुुलैपासून पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 जुलै रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 24 जुलै रात्री बारा वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शेतीच्या कामांना आणि केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या कंपन्यांना या लॉकडाऊनमधुन सूट देण्यात आली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत आज (13 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत चालला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात पूर्णपणे संचारबंदी अंमलात आणावी किंवा कसे? या गंभीर विषयावर आज जल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हळदे, पोलीस अधीक्षक डॉ. अनिल पारसकर, सर्व आमदार यांची उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.

रायगडात रविवार (12 जुलै) अखेर बाधित रुग्णांची संख्या 7 हजार 763 वर गेली आहे. यापैकी 212 जणांना कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. विशेषतः पनवेल तालुक्यात वेगाने होणारा कोरोनाचा फैलाव चिंताजनक आहे. कंपन्या असलेल्या अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, महाड तालुक्यातही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन करण्याची मागणी पुढे येत होती. त्याअनुषंगाने आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

जिल्ह्यात 15 जुलै रोजी रात्री 12 वाजल्यापासून 24 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शेतीच्या कामांना तसेच केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या कंपन्यांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. पण गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये. अचानक लॉकडाऊन नको म्हणून नागरिकांना दोन दिवस देण्यात आले आहेत. पहिल्या लॉकडाऊनसारखेच नियम 15 जुलैपासून लागू राहणार असून, 24 जुलैनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनच्या कालावधीत दारु विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. चिकन, मटण, मासे विक्रीही बंद राहणार आहे. मेडिकल आणि दूध या सुविधा सुरुच राहतील. लॉकडाऊनदरम्यान होम डिलीव्हरीची सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. ज्या नगरपालिकांनी बंद पाळले आहेत, त्यांनीही लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हायचे आहे. कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा दहा दिवसांचा लॉकडाऊन घेत असल्याचे पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.

ऑक्सिजन बेड वाढविण्याचे प्रयत्न; कंट्रोल रुम सुरु करणार 

पॉझिटीव्ह रुग्णाला बेड मिळायला उशीर होतो, त्यादृष्टीने समन्वय वाढविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी प्रांत कार्यालयात कंट्रोल रुम सुरु करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातही संपर्कासाठी सोय करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे रुग्णाला वेळेत रुग्णालयात वेळेत दाखल करणे व त्याच्यावर उपचार करणे सोयीचे ठरेल. या कंट्रोल रुमचा रुग्णांना फायदा होईल, असा विश्‍वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच कोरोना रुग्णांवर घरीही उपचार होऊ शकतात, त्यासाठी लोकांनी सहकार्य केले पाहिजे, असेही आदिती तटकरे म्हणाल्या.

जिल्ह्यातील प्रत्येक तुलक्यातील कोरोना रुग्णांवर उपचार होणार्‍या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात किमान 25 ते 30 ऑक्सिजन बेड असावेत, यावर भर देण्यात येणार आहे. पॉझिटीव्ह रुग्णाला बेड मिळायला उशीर होतो, त्यादृष्टीने समन्वय वाढविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here