कारखानदारांच्या पैशाने रोह्यात कोव्हीड सेंटरची उभारणी!

0
1109
राज्य व केंद्र शासनाने दिलेला निधी गेला कुठे? रोहेकरांचा सवाल!

मिलिंद अष्टीवकर/रोहा : रोहा तालुक्यातील किल्ला येथे सुमारे 140 खाटांचे कोव्हीड सेंटर धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांच्या पैशांतून उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन रायगडचे खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. रोहा उपजिल्हा रुग्णालयात सोयीसुविधा नसल्याने त्या पुरविण्यासाठी विविध सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्ती पुढाकार घेत आहेत. तर कोव्हीड सेंटरची उभारणी व पुढील खर्चाचा भारदेखील आरआयए या कारखानदारांच्या संघटनेला करण्याच्या सूचना संबंधितांनी दिल्या आहेत.

मागील चार महिन्यांपासून रोहा तालुक्यात कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचे वारंवार निदर्शनास आले. रुग्णवाहिका व कोव्हीड सेंटर धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कारखानदारांच्या संघटनेकडून तर ऑक्सिजन देण्यासाठी यंत्र, जेवण, गरम पाणी, रुग्णालयाच्या पुढील पावसाळी शेड विविध संस्था व दानशूर व्यक्ती यांच्याकडून दिले जात आहे. मग कोव्हीडसाठी राज्य व केंद्र शासनाने दिलेल्या निधीतून काय केले? का निधीच उपलब्ध झाला नाही? असा प्रश्न रोहेकर विचारत आहेत.

या सेंटरमधील प्रती बेडसाठी सुमारे पाच हजार खर्च सांगण्यात आला असून यामध्ये बेड, गादी, उशी तसेच चादर, बेडशीट व उशी कव्हर यांचा समावेश आहे. तसेच येणार्‍या रुग्णांचे दिवसभरातील भोजन तसेच कपडे धुलाई यासाठीदेखील प्रती व्यक्ती प्रती दिवस 300 याप्रमाणे खर्च रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन यांना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सेंटरसाठी आवश्यक डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारीवर्ग यांचा खर्चदेखील रोहा इंडस्ट्रीज यांच्याकडूनच करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

कोरोना उपचारासाठी शासकीय निधी कुठे खर्च होतो? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सुदर्शन कंपनीच्या दाव्यानुसार त्यांनी 10 व्हेंटीलेटर पुरविले आहेत. ते नक्की कुठे आहेत? सारे काही जनता व कंपन्या करणार असतील तर शासन काय करत आहे? असे एक ना अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. या कोव्हीड सेंटरसाठी कृषी महाविद्यालयाची इमारत, पाणी व वीज शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here