रायगडातील 407 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी! 24 तासांत 20 मृत्यूंची नोंद

0
1907

मृत्यूंची वाढती संख्या रायगडकरांसाठी चिंताजनक

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांपैकी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे समाधानकारक असले तरी, मृत्यूंचा वाढता आकडाही चिंता वाढवणारा आहे. आज जिल्ह्यात 20 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मृतांची संख्या चारशे पार गेली आहे.


रायगडात आजअखेर कोरोना बाधित रुग्णांची संख्या 14 हजार 863 वर पोहोचली आहे. यापैकी 11 हजार 88 रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. त्यांनी स्वतःच्या इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्तीचा जोरावर कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74 टक्के आहे. तर दुर्दैवाने 407 रुग्णांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. मृत्यूंचे हे प्रमाण 3 टक्के असले तरी, 407 जणांना त्यांच्या कुटुंबियांनी कोरोनामुळे गमावले आहे.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 20 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रातील 6, पनवेल ग्रामीण 1, खालापूरातील 3, कर्जत 1, पेण 4, अलिबाग 2, रोहा 1 आणि महाड तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत पहिल्यांदाच एकाच दिवशी 20 मृत्यू नोंदवले गले आहेत.

आतापर्यंत झालेल्या 407 मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू हे पनवेल तालुक्यातील आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 160 आणि पनवेल ग्रामीणमध्ये 45 असे तालुक्यात 205 रुग्ण दगावले आहेत. उरणमध्ये 28, खालापूरात 31, कर्जतमध्ये 18, पेणमध्ये 26, अलिबाग 28, मुरुड 10, माणगावात 3, तळामध्ये 2, रोह्यात 15, सुधागडात 1, श्रीवर्धनमध्ये 4, म्हसळ्यात 7, महाडमध्ये 23 आणि पोलादपूरात 6 मृत्यूंची नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here