कोरोना, अतिवृष्टीमुळे रखडलेली कामे मार्गी लागणार – मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील

0
448

सुधीर नाझरे/मुरुड : कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर आलेले निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी यामुळे शासनाच्या निर्णयानुसार मंजूर केलेली प्रस्तावित कामे करता आली नाहीत. ती कामे आता मार्गी लागणार आहेत. निसर्गाची मेहरबानी आणि प्रशासनाचे कोरोनासोबत आपला दिनक्रम सुरु करण्याचे धोरण यानुसार खोळंबलेल्या कामाला पुन्हा गती मिळणार आहे, असा विश्‍वास मुरुडच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच याकरिता सर्व जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

कोरोनाची कार्यवाही आणि विकासकामे यासंदर्भातील प्रशासनाच्या भूमिकेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करतानाच पक्क्या रस्त्यांची रखडलेली कामे पावसाळ्यानंतर सुरू होतील. परंतु पालिका नियोजनानुसार  ठरल्याप्रमाणे खड्ड्यांसंदर्भातील कामे पावसाची उघडीप पडल्यानंतर येत्या काही दिवसांमध्ये सुरू होतील, अशी माहिती नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भव कमी करण्यासाठी मुरुड नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. शहरासह ग्रामीण भागात नागरिकांनी शासकीय दवाखान्यात जाणे बंद केल्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होऊ नये त्यासाठी बाजारपेठेतील शासकीय दवाखान्यात ओपीडीसंदर्भात स्थानिक डॉक्टराची मिटींग घेण्यात आली. अचानक निसर्ग चक्रीवादळाचा फटका  तालुक्यासह शहराला बसला, त्यात मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई मिळावी, याकरिता शासनाने पंचनाम्याकरिता नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी अधिकारी नेमले. त्यामुळे पंचनामे जलदगतीने होऊन नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यास सुरुवात झाली. चांगले काम करुनही नगरपरिषदेच्या कारभारावर टिका केली जात असल्याची खंत स्नेहा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील रखडलेल्या कामांसंदर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमित पंडीत यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. मुरुड हद्दीतील खड्डे बुजविण्याचा ठेका वसुंधरा डेव्हलपर्स यांना 9 लाख 30 हजार 175 रुपये एवढ्या किंमतीत   22 मे 2020 रोजी देण्यात आला होता. परंतु शहरातील खड्डे बुजविण्यास ते असमर्थ राहिल्याने आता नगरपरिषद कर्मचार्‍यांतर्फे पावसाचा ओघ कमी झाल्यावर सर्व खड्डे तातडीने डांबर खडी टाकून बुजविण्यात येतील आणि नव्याने मंजूर झालेल्या रस्त्याची कामे पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे, असे नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले.

चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर जास्तीत जास्त रक्कम मिळावी, याकरिता पालकमंत्री, आमदार, कृषीमंत्री यांना निवेदन आपल्या नगरपरिषदेतर्फे निवेदन देऊन सतत पाठपुरवा करीत आहे. वीज बिल माफ होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. चक्रीवादळामुळे शहरातील गावदेवी पाखाडी येथील स्मशानभूमी शेडचे छपर उडाले होते. त्या कामालाही सुरुवात झाली आहे. उर्वरीत रखडलेल्या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल. नगरपरिषद प्रशासन आपल्या परिने काम करीत आहे, अशी माहिती नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here