जिल्ह्यातच होणार आता कोरोनाची ट्रू-नॅट टेस्ट

0
2430
पालकमंत्री आदिती तटकरे यांची ‘कोविड टेस्ट लॅब’ची मागणी

अलिबाग । जिल्ह्यातील नागरिकांसाठी कोरोनाची ‘ट्रू नॅट टेस्ट’ आता जिल्ह्यातच केली जाणार आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली असून राज्यामध्ये अशा प्रकारच्या 109 ‘ट्रू नॅट टेस्टींग लॅब’ आहेत. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मात्र आरोग्य मंत्र्यांकडे कोविड टेस्ट लॅबची मागणी केली आहे.

कोरोना संशयितांच्या दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. यात ‘ट्रू नॅट टेस्ट’ आधी केली जाते. या टेस्टमध्ये रुग्ण निगेटीव्ह आला तर त्याला पुढची म्हणजे ‘आरटी-आरटी पीसीआर टेस्ट’ करायची आवश्यकता नसते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता सरसकट मुंबईतील रुग्णालयात टेस्ट करण्याकरिता पाठवण्याऐवजी एक पर्याय सरकारने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दिला आहे.

या पर्यायामुळे रायगड जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांची प्राथमिक चाचणी रायगडातच होणार आहे. असे जरी असले तरी रायगडकरांसाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात करोना विषाणू तपासणी यंत्रणा व प्रयोगशाळा मंजूर व्हावी, अशी मागणी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाली तर जिल्ह्यातील नागरिकांची वेळेत आरोग्य तपासणी होऊन स्वॅब टेस्टींग रिपोर्ट जिल्हा स्तरावरच आणि वेळेत उपलब्ध होऊ शकतील, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here