कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

0
738

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात आज (9 जुलै) आठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली आहे. पोलादपूर तालुक्यातील धामणदेवी गावच्या हद्दीत दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कालपासूनची ही तिसरी घटना आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यात धामणदेवी गावाच्या हद्दीत आठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे दीड तासांपासून महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलादपूर पोलीस, एलअँडटीची टीम आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड उपसण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र दरड मोठी असल्याने, रात्रभर हे काम सुरु राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान, कशेडी घाट वाहतुकीस पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

कालपासूनची दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. बुधवारी (8 जुलै) महाड ते विन्हेरे बाजूकडे जाणार्‍या रस्त्यावरील कुर्ला घाटामध्ये दरड कोसळली होती. रात्री पोलिसांनी ही दरड हटवून मार्ग मोकळा केला होता. आज सकाळी पुन्हा याच ठिकाणी दुसर्‍यांदा दरड कोसळली. तर सायंकाळी उशिरा कशेडी घाटात दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here