लोकसहभागातून उभी राहिली होनाड तलाठी कार्यालयाची सुसज्ज इमारत

0
508
होनाड तलाठी कार्यालयाच्या लोकार्पणप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार व इतर मान्यवर.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते लोकार्पण

संदीप ओव्हाळ/खोपोली । लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या राहिलेल्या सुसज्ज, वातानुकूलित होनाड तलाठी कार्यालयाच्या नुतन इमारतीचे लोकार्पण आज (1 ऑगस्ट) रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते पार पडले. त्यामुळे होनाड, आत्करगाव ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी, नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

रायगडच्या शेवटच्या टोकावर असलेल्या खालापूर तालुक्यातील होनाड, आत्करगांव ग्रामपंचायतीतील शेतकर्‍यांना सातबारा मिळविण्यासाठी दोन-तीन किमी पायपीट करत साजगांव तलाठी कार्यालय गाठावे लागत होते. येथील नागरिकांची होणारी परवड लक्षात घेत जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील, होनाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निकेश देशमुख, आत्करगांव ग्रामपंचायतीचे सदस्य समीर देशमुख यांनी 13 लाख रुपये खर्च करून सुसज्ज वातानुकूलित तलाठी कार्यालय उभेे केले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते आज या कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

होनाड गावच्या गणपती विसर्जन घाटाजवळ वातानुकूलित, सुसज्ज होनाड तलाठी कार्यालयाची इमारत उभी राहिली आहे. लोकार्पण कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा सदस्य नरेश पाटील, प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार इरेश चप्पलवार, होनाडच्या सरपंच अपर्णा देशमुख, माजी सरपंच निकेश देशमुख, आत्करगांव ग्रामपंचायतीचे सदस्य समीर देशमुख, अमोल देशमुख, संतोष पाटील, हेमंत पाटील, उपसरपंच महेश देशमुख यांच्यासह येथील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

होनाड तलाठी अभिजीत हिरवडकर यांनी लोकसहभागातून तलाठी कार्यालय उभे केले असून ते ज्या तलाठी सजा कार्यालयात जातात, त्याठिकाणी लोकसहभागूत अशीच कार्यालय उभी करतात, अशी माहिती जिल्हाधिकारी यांना तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी दिली. तेव्हा अशा कर्तव्यदक्ष तलाठीची तीन महिन्यांनी बदली केल्यास जिल्ह्यातील सर्व कार्यालये सुसज्ज निर्माण होतील, असे सांगत होनाड येथील सुसज्ज वातानुकूलित कार्यालय तयार करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेष कौतुक केले आहे.

होनाड तलाठी कार्यालयाची इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव तलाठी यांनी देताच आम्ही क्षणाचा विलंब न लावता इमारत बांधण्यासाठी तयारी दर्शवत जिल्हा परिषद सदस्य नरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. दहा वर्षांपूर्वी तालुक्यातील पहिले होनाड ग्रामपंचायतीचे कार्यालय वातानुकूलित बनविले होते. त्याचपध्दतीने तलाठी कार्यालय उभे केले असल्याचा अभिमान होनाडचे माजी सरपंच निकेश देशमुख यांनी व्यक्त करीत येथील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here