रोहा तांबडी येथील ‘त्या’ अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

0
8656
…आणखी सहाजण ताब्यात; एका अल्पवयीन मुलाचाही समावेश

रोहा : रोहा तांबडी येथील बलात्कार व हत्या प्रकरणात आज आणखी सहा नराधमांना रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. यामध्ये १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तांबडीतील ‘त्या’ 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर या सर्वांनी मिळून सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या घटनेप्रकरणी रायगडातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

रोहा तांबडी येथील पीडित मुलगी 26 जुलै रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी घेऊन तिच्या आजोबांना आणण्यासाठी ताम्हणशेत येथील शेतावर निघाली होती. मात्र रात्रीचे आठ वाजले तरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी, ग्रामस्थांनी शोध घेतला असता रात्री साडेनऊ वाजण्याच्यादरम्यान ती ताम्हणशेत बुद्रुक गावच्या रस्त्यावरील वावळ्यांचा कोंड या ओहळाच्या मध्यभागी एका दगडावर मृतावस्थेत आढळून आली होती. तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण रायगडातून तीव्र संताप व्यक्त करत, आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

27 जुलै रोजी रोहा पोलीस ठाण्यात याप्रकरणी बलात्कार, हत्या व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामध्ये 12 तासांच्या आत एकाला ताब्यात घेण्यात आले. मात्र घटनेच्या सुरुवातीपासून पीडित मुलीचे नातेवाईक, ग्रामस्थ यांनी या प्रकरणात एकापेक्षा अधिक जणांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविली होती. त्याअनुषंगाने तपास सुरु होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे हे प्रकरण सोपविण्यात आले. अटक केलेल्या तरुणाने चौकशीत गुन्ह्यामध्ये इतर काही जणांचा सहभाग असल्याची माहिती दिली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून तांबडी गाव परिसरातील आणखी सहा नराधमांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषणने ताब्यात घेतले असून, यापैकी एकजण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तरुणासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, सदर गुन्ह्याच्या पुढील तपास करण्यासाठी विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेऊन 5 सज्ञान नराधमांना अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख करीत आहेत.

  • पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
    तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर 26 जुलै रोजी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेची पालकमंत्री या नात्याने गंभीर दखल घेऊन आदिती तटकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यांना या घटनेतील माणुसकीला काळीमा फासणार्‍या नराधमांना अत्यंत कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने गृह विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here