दहावी पास झालेल्या सावित्रीच्या लेकींची प्रेरणादायी कथा

0
545
रोहे, पाले खुर्द आदिवासी वाडी येथील पहिल्या दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सावित्रीच्या लेकी.

रोहा-पाले खुर्द आदिवासीवाडीतील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

नंदकुमार मरवडे / खांब-रोहा : दहावीचा निकाल लागला. यामध्ये रोहा-पाले खुर्द आदिवासी वाडीसाठी हा निकाल खास होता. या वाडीतील पहिल्यांदाच कोणी मुलगी दहावी पास झाली होती. खरे तर एक नव्हे पाच मुलींनी हा इतिहास रचला आहे. या वाडीत यापूर्वी कोणीही मुलगी दहावीपर्यंत शिकलेली नव्हती. त्यामुळेच वाडीसाठी या सावित्रीच्या लेकींची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे.

सर्वांच्या घरची परिस्थिती बिकट, आई-वडील जेमतेम शिकलेले तर काहींचे निरक्षर. त्यावेळी वाडीतील मुलींचे शिक्षण जेमतेम आठवीपर्यंत व्हायचे. पुढे मात्र कोणी शिकत नव्हते. ह्या पाच मुलींचीही तीच गत. अनेकदा घरच्या लहान भावंडांना सांभाळणे, घरचे कामे करणे, बकर्‍या सांभाळणे, कधी कधी आई-वडिलांना कामात मदत करणे अशी कामे करत करत ह्या मुलींनी जिद्दीने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षक गजानन जाधव यांनी यासाठी त्यांचे कसब लागले.

पुढे पाचवीच्या शिक्षणासाठी कोलाडला जावे लागायचे. त्यावेळी गजानन जाधव यांनी पालकांना सांगून त्यांना हायस्कुलमध्ये प्रवेश घ्यायला लावला. त्यानंतर दररोज 2 किमी डोंगर उतरून-चढून व पुढील 8 किमीचा प्रवास, कधी चालत तर कधी पैसे असल्यास रिक्षाने करून शाळा न चुकवता पाचवी ते दहावीचा टप्पा पूर्ण केला.

२९ जुलै रोजी दहावीचा निकाल लागला. सायंकाळी बातमी आली, या पाचही मुली चांगल्या गुणाने पास झाल्या. त्यातील मोहिनी वामन जाधव हिला ५७.२० टक्के, रेश्मा रामचंद्र वाघमारे हिला ६१.८० टक्के, दीपाली राजेश जाधव ५१.२० टक्के, शुभांगी महेंद्र वाघमारे ५७.२० टक्के, रोहिणी रविंद्र वाघमारे ५९.२० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.

या पाचही मुलींचे व तिच्या आई-वडिलांचे सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे. ह्या पाचही सावित्रीच्या लेकींना पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here