खोपोली नगरपरिषद राबविणार ‘खालापूर नगरपंचायत पॅटर्न’

0
321
खालापूर पॅटर्न । घरोघरी आरोग्य तपासणीवेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे, खालापूर नगरपंचायत उपनगराध्यक्षा शिवानी जंगम व कर्मचारी. 13 एप्रिलला खालापूरात राबविलेला हा पॅटर्न पाच महिन्यानंतर का होईना, खोपोलीत राबविण्यात येत आहे. (संग्रहीत छायाचित्र)
  • 1 व 2 ऑगस्ट रोजी आरोग्य मोहिमेचे आयोजन
  • घरोघरी जाऊन करणार नागरिकांची आरोग्य तपासणी

संदीप ओव्हाळ/खोपोली : खालापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाला रोखण्यासाठी खोपोली नगरपरिषद घरोघरी आरोग्य तपासणीसाठी आता ‘खालापूर पॅटर्न’ वापरणार असून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन खोपोली नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केले.

कोरोनाच्या पहिल्याच टप्प्यात एप्रिल महिन्यातच खालापूर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम आणि मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी खालापूरातील खाजगी सेवा देणार्‍या डॉक्टरांच्या मदतीने घरोघरी आरोग्य तपासणी मोहीम राबवली होती. त्यामुळे खालापूर नगरपंचायत हद्दीत कोरोना प्रसाराला मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. त्याच्या उलट परिस्थिती खोपोली शहरात होती. दररोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत होते.

खोपोली नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून सुरेखा भणगे यांनी कारभार हाती घेताच नियमांचे पालन न करणारे नागरिक, दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. कारवाईपुरते मर्यादित न राहता नगरपरिषदेची जबाबदारी म्हणून आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. आता खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा भणगे, उपनराध्यक्षा विनिता कांबळी औटी, आरोग्य सभापती वैशाली जाधव यांच्यासह सर्व सभापती, नगरसेवक आणि नगरसेविकांच्या पुढाकाराने 1 व 2 ऑगस्ट रोजी नगरपरिषद खोपोलीच्यावतीने ‘आरोग्य सेवा तुमच्या दारी’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय आरोग्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ डॉक्टर्स यांनी सुचविल्याप्रमाणे उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची टीमही सज्ज असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. तसेच ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा खवखवणे अशा प्रकारचा काही त्रास होत असेल तर आरोग्य सेवा देणार्‍या पथकाला माहिती द्या, असे आवाहन नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here