100 टक्के कारखाने बंद ठेवणार असाल तर लॉकडाऊन करा!

0
4508

काँग्रेस नेते माणिक जगताप गरजले

अलिबाग : रायगडात 100 टक्के कारखाने बंद करुन लॉकडाऊन करणार असाल तर लॉकडाऊन असावा, मात्र कारखाने सुरु ठेवणार असाल तर 100 टक्के लॉकडाऊन नसावा, असे स्पष्ट मत काँग्रेस नेते माजी आमदार माणिक जगताप यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात 15 जुलै रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 24 जुलै रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र या लॉकडाऊनमधून केंद्र सरकारने परवानगी दिलेल्या कंपन्यांना मात्र वगळण्यात आले आहे. त्यामुळे रायगडातील जनतेने तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. कोरोना पसरण्याला कारणीभूत ठरत असलेल्या कंपन्याही बंद कराव्यात, असा सूर उमटतो आहे.

याबाबत काँग्रेस नेते माणिक जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, कारखानेही 100 टक्के बंद ठेवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, लॉकडाऊन हा आता कालबाह्य गेलेला विषय आहे. लॉकडाऊन करुनही आपण फार काही साध्य करु शकलेलो नाही. रुग्णांची संख्या वाढते आहे, तरीही जनजीवन सुरळीत आहे. कोरोनाच्या गेल्या काही महिन्यांत नागरिकांनी खूप काही भोगले आहे. एकीकडे नागरिकांना लॉकडाऊन करायला सांगितले जाते, तर दुसरीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील उद्योग मात्र सुरु आहेत, याबाबत माणिक जगताप यांनी नाराजी व्यक्त केली.

लॉकडाऊन केला जात असताना, जिल्ह्यातील एमआयडीसी सुरुच आहेत. आरसीएफ, जेएनपीटी, सुदर्शन सारख्या कंपन्या सुरुच आहेत. मात्र  या कारखान्यात जाणार्‍या कामगारांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे पहायला मिळते आहेत. म्हणूनच 100 टक्के कारखाने बंद करुन लॉकडाऊन करणार असाल तर लॉकडाऊन असावा. जर कारखाने सुरु ठेवणार असाल तर 100 टक्के लॉकडाऊन नसावा, असे स्पष्ट मत माणिक जगताप यांनी व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here