मुंबईतून श्रीवर्धनकडे चालत निघालेल्या चाकरमान्याचा खारपाडा येथे मृत्यू

0
1055

सरकारी निष्क्रीयतेचा आणखी एक बळी…जिल्ह्यातील तिसरी घटना

पेण : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या चाकरमानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चालत गावची वाट धरली आहे. भर उन्हात महामार्गावरुन निघालेल्या या चाकरमान्यांसह त्यांच्या लहान लहान लेकरांचे हाल बघवत नाहीत…मात्र सरकारला आणि प्रशासनाला याचे सोयरेसुतक नाही. त्यांच्या या निष्क्रीयतेमुळे गुरुवारी (15 मे) रायगडातील आणखी एका चाकरमान्याचे कुटुंब मुंबई ते श्रीवर्धन या पायी प्रवासात उद्ध्वस्त झाले आहे.

मुंबईतील कांदिवली येथून आपल्या कुटुंबासह श्रीवर्धनकडे चालत निघालेल्या मोतीराम जाधव (वय 43) यांचा गुरुवारी पेण तालुक्यातील खारपाडा येथे रस्त्यात मृत्यू झाला. मूळचे श्रीवर्धन आदगाव येथील सात जणांचे जाधव कुटुंब मुंबईतील कांदिवली येथून चालत निघाले. तीव्र उन्हाच्या झळा…थकलेला जीव…मात्र तरीही गावी जाण्याची तीव्र ओढ असल्याने हे कुटुंब पावले टाकत होते.

गुरुवारी 80-82 किलोमीटरची पायपीट केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते पेण तालुक्यातील खारपाड्यापर्यंत आले. एवढे अंतर चालून थकलेल्या मोतीराम जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते रस्त्यात कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. क्षणार्धात या चाकरमान्याचे कुटुंब उद्ध्वस्त आले. हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग. रस्त्यात त्यांच्या कुटुंबाचा सुरु असलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते गाव या प्रवासात आतापर्यंत झालेला तिसरा मृत्यू आहे. याआधी श्रीवर्धन मारळ येथील एका महिलेचा माणगाव येथे मृत्यू झाला होता. त्यानंतर महाडमध्येही एका चाकरमान्याचा रस्त्यात मृत्यू झाला होता.