माणगाव : पॉस्को कंपनीतील 20 कामगारांना कोरोनाची लागण

0
4092

आणखी 136 जणांचे स्वॅब पाठविले तपासणीसाठी

सलीम शेख/माणगाव : दक्षिण रायगडातील रोहा, महाड एमआयडीसीतील कंपन्यांपाठोपाठ आता माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक वसाहतीतील पॉस्को कंपनीतील 20 कामगार कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तशी माहिती माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले यांनी दिली आहे.

पॉस्को कंपनीतील 20 कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती शनिवारी (25 जुलै रोजी) कंपनीकडून प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांना देण्यात आली. त्यानंतर प्रांताधिकारी यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले यांना याबाबतची माहिती दिली. तसेच कंपनीतील आणखी 136 जणांचे स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. इंगोले यांनी सांगितले.

माणगाव तालुक्यातील सुमारे 50 गावांतून आतापर्यंत 281 कोरोनाचे रुग्ण आढळले असून यापैकी 179 रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वतःच्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर पूर्णपणे ठणठणीत बरे झाले आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 99 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आता पोस्को कंपनीत कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तालुक्यातील नागरिक अधिकच चिंताग्रस्त बनले आहेत.

पॉस्कोे कंपनीत कोरोना पॉझिटीव्ह आलेले कर्मचारी हे माणगाव, रोहा, अलिबाग तालुक्यातील तसेच नागपूर, पुणे व  उत्तराखंड येथील रहिवासी आहेत. लॉकडाऊननंतर आपल्या गावी गेलेले कामगार पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यात आता कंपनीतील 20 जण एकाचवेळी पॉझिटीव्ह आल्याने माणगाव तालुक्यासाठी ही चिंतेची बाब मानली जात आहे.  दरम्यान, तालुक्यातील जनतेने सरकारच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे.

पॉस्को कंपनीला उपजिल्हा रुग्णालयाकडून पत्र
पॉस्को कंपनीचे आडमुठे धोरण कोरोना काळातही पुढे आले आहे. कोरोना संकटात तालुक्यातील कामगारांचे स्वॅब माणगाव उपजिल्हा रुग्णालयामार्फत पाठविणे आवश्यक असतानाही कंपनी आपल्या कामगारांचे स्वॅब परस्पर खासगी प्रयोगशाळेतून पाठवित असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाकडे तालुक्यातील आकडेवारीचा ताळमेळ राहत नाही. यासाठी पॉस्को कंपनीने कोरोनाची लक्षणे दिसणार्‍यांचे स्वॅब अहवाल माणगाव उपजिल्हा रुग्णालयामार्फत पाठवावे, असे पत्र माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले यांनी पॉस्को कंपनीच्या चेअरमनना पाठवले आहे. या पत्राची प्रत रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय अलिबाग, प्रांताधिकारी माणगाव व तहसीलदार माणगाव यांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here