नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे ऑनलाईन उद्घाटन

0
977
सर्वसामान्यांच्या उपचाराकरिता हे कोविड केअर सेंटर उपयुक्त ठरणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अलिबाग : रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी, संचालक हितलभाई मेसवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात 50 बेड मर्यादेचे उभारलेले कोविड केअर सेंटर सर्वसामान्यांच्या कोविड उपचाराकरिता उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आज (25 जुलै) या कोविड केअर सेंटरच्या ई-उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, नागोठणे रिलायन्स मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजनचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, एचआर हेड चेतन वाळंज हे या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे, आ.रविंद्र पाटील, आ.अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभय ससाणे तसेच नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीजचे आयआर हेड विनय किर्लोस्कर, इस्टेट हेड अजिंक्य पाटील, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, डॉ.उद्धव कुमार, डॉ.प्रशांत बारडोलोई हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील नागरिकांना योग्य पध्दतीने कोविड आजारावर उपचार मिळण्याकरिता रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आवश्यक सोयी-सुविधा, अद्ययावत वैद्यकीय सामुग्रीसह उभे केलेले हे 50 बेडचे कोविड केअर सेंटर सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. कोरोनाच्या संकटात रिलायन्स, टाटा, बिर्ला यासारख्या कंपन्यांनी पुढे येऊन जी मदत केली आहे ती निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शासन सर्व प्रकारे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या संसर्गातून बर्‍या होणार्‍या नागरिकांची संख्या वाढत आहे, ही दिलासादायक बाब आहे. प्रशासनाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जास्तीत जास्त करून सोशल डिस्टंन्सिंग, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे या सूचनांचे पालन नागरिकांनी जास्तीत जास्त करावे, यासाठी अधिक प्रयत्न करावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. शेवटी मुख्यमंत्र्यांनी ‘संकटात संधी’ या उक्तीचा अर्थ ध्यानात घेऊन शासन आरोग्य यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून रायगडमध्ये रिलायन्स समूहाच्या माध्यमातून अद्ययावत चांगले रुग्णालय उभे करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे रिलायन्स समूहाला आवाहन केले.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी, कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य यंत्रणेकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण संघटीतपणे खर्‍या अर्थाने हे शासन रयतेचे आहे, या उद्देशाने अहोरात्र काम करीत असल्याचे म्हटले. खासदार सुनील तटकरे यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजने हे कोविड केअर सेंटर उभारल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि महाराष्ट्र बलशाली होण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करू या, असे आवाहनही केले.

नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्त करताना रिलायन्स औद्योगिक समूह नेहमीच शासनाला मदत करण्यासाठी आघाडीवर राहील तसेच जनतेसाठी काम करणे, हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे कर्तव्य असल्याचे सांगितले. याप्रसंगी या कोविड केअर सेंटरच्या उभारणीबद्दलची लघुचित्रफीत दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय एज्युकेशन विद्यासंकुलाचे संस्थापक-अध्यक्ष किशोर जैन यांनी केले. सूत्रसंचालन नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीजचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी केले. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला नागोठणे परिसरातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

दरम्यान, या कोविड केअर सेंटरचा प्रामुख्याने नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या परिसरातील दहा ग्रामपंचायतीमधील 50 गावे व आदिवासी वाड्या-वस्त्यांसाठी उपयोग होणार आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये पुरुषांसाठी 35 बेड तर महिलांसाठी 15 बेड अशा एकूण 50 बेडची व्यवस्था असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here