पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर…वर्षा सहली बंदच

0
672
नेरळ माथेरान घाटाच्या प्रवेशद्वार येथे बंदोबस्त करताना पोलीस.
जमावबंदी आदेशाचे लॉकडाऊन काळात काटेकोर पालन

संतोष पेरणे/कर्जत : कर्जत तालुक्यातील पाणवठ्यांवर पावसाळ्यात मौजमजा करण्यासाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्येही काही हौशी तरुण-तरुणी माथेरानच्या डोंगरात असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनासाठी येत होते. मात्र पोलिसांनी मागील काही दिवस चोख बंदोबस्त ठेवला असून पर्यटकांनाच काय, स्थानिकांनादेखील धबधबे आणि माथेरानच्या रस्त्यांवर फिरकू दिले जात नाहीये. दरम्यान, तालुक्यातील अन्य धबधबेदेखील पर्यटकांपासून दूर असून पोलिसांचा खडा पहारा असल्यामुळे वर्षासहलीचे बेत फोल ठरत आहेत.

पावसाळ्यात कर्जत आणि खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येतात. मात्र अनेकजण मद्य पिऊन पाण्यात उतरतात, काहींना पोहता येत नाही, त्यामुळे बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडतात. मागील पाच वर्षांत किमान 50 पर्यटकांचे जीव धबधब्यात वाहून जाऊन, धरणात बुडून झाले आहेत. त्यात मुंबईपासून जवळ असल्याने होणारी गर्दी आणि त्या गर्दीमुळे कायदा सुव्यवस्थाही राखता येत नव्हती. त्यामुळे शासनाने धबधबे, धरण क्षेत्राच्या 1 कि.मी. परिसरात जमावबंदी लागू केली आहे. कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण, पाली भूतिवली धरण, सोलनपाडा धरण-पाझर तलाव, कोंढाणे धरण-धबधबा, पाषाणे तलाव, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, बेडीसगाव धबधबा, बेकरे धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा या गजबजलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू असल्याने कोणालाही पर्यटनासाठी मोठ्या संख्येने जाता आले नाही.

त्या जमावबंदी आदेशात धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे आणि उघड्यावर मद्य सेवन करणे, धोकादायक वळणांवर सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण फोटोग्राफी करणे, पावसामुळे वेगाने वाहणार्‍या पाण्यात, खोलपाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली करणे बंदी राहणार आहे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे, वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस परिणाम, अडथळा होईल अशाप्रकारे वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लॅस्टीकच्या बाटल्या, थर्माकॉल व प्लॅस्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे, सार्वजनिक ठिकाणी येणार्‍या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, ध्वनी प्रदूषण होईल अशा आवाजात सार्वजनिक ठिकाणी संगीत यंत्रणा वाजविणे, ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती न करणे तसेच धबधब्याच्या एक कि.मी. परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना 22 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

असे आदेश लागू असतानाही काही पर्यटक हे दुचाकी घेऊन पोहचत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये नेरळ पोलिसांनी पर्यटकांची सर्वाधिक गर्दी असलेल्या नेरळ-माथेरान घाटातील धबधबे यांच्याकडे जाणारा रस्ता जुलै महिन्यापासून बंद केला आहे. माथेरान येथील पर्यटनस्थळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च 2020 पासून बंद आहे. त्यामुळे घाटात कोणीही पर्यटक जाऊ नये, यासाठी नेरळ पोलिसांनी कंबर कसली आहे. नेरळ पोलीस माथेरान रस्त्याचे प्रवेशद्वार असलेल्या हुतात्मा चौकात रस्ता बंद करून बसले आहेत. तेथे बॅरिकेट लावण्यात आल्या असून कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला जाऊ दिले जात नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेरळ पोलिसांचा राबता तेथे असल्याने माथेरान घाटात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचा वावर दिसून येत नाही. त्याचवेळी नेरळ मोहाचीवाडी येथून काही ट्रेकर्स हे पेब किल्ल्यावर जात असतात. त्यांचा मार्गदेखील नेरळ पोलिसांनी शेलू येथे असलेल्या सीमा हद्द बंद करून आणि आनंदवाडी येथे पोलीस कर्मचारी लावून तो मार्गदेखील बंद ठेवला आहे.

मुंबई-पुण्यकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक पावसाळ्यात येत असतात. यावर्षी उपनगरीय लोकल बंद असल्याने त्यांचा वावर थांबला आहे. पण वाहने घेऊन येणार्‍या पर्यटकांवर कर्जत तालुका हद्दीत प्रवेश दिला जात नाही. कर्जत पोलिसांकडून पळसदरी धरणाकडे आणि धबधब्याकडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या खड्या पहार्‍यामुळे वर्षासहली बंदच आहेत.

आम्ही आमचा 10 जणांचा स्टाफ जमावबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी कामाला लावला आहे. लॉकडाऊन काळात फारसे गुन्हे घडत नसल्याने धबधबे येथे जाऊन नाहक जाणारे बळी रोखण्याचे काम आम्ही बंदोबस्त ठेवून करीत आहोत. मागील काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी अद्याप एकही बळी धबधबे आणि धरणाच्या परिसरात झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे.
– अविनाश पाटील,
सहायक पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here