जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये उद्या दुपारपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल ; खा. सुनील तटकरे यांची माहिती

0
1317

अलिबाग । चक्रीवादळाला 3 ऑगस्टला दोन महिने पूर्ण होतील. सरकारने मदतीची रक्कम दुप्पट केल्यामुळे चक्रीवादळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. श्रीवर्धन, म्हसळा, तळा, अलिबागधील काही गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. उद्या दुपारपर्यंत या सर्व गावांमध्ये वीज येईल, अशी माहिती खा. सुनील तटकरे यांनी दिली. जिल्ह्याची कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करण्यासाठी रेवदंडा येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची मोलाची मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना या सरकारने दिलेली मदत ही याआधीच्या सरकारपेक्षा तीनपटीने अधिक आहे. काहींना अजूनही आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनाही मदत मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहे. चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या बागायतदारांना 50 हजार हेक्टरी मदतीचे वाटप करण्याऐवजी नारळ, सुपारीला झाडनिहाय मदत देण्याचे आदेश सरकारने दिले. त्यानुसार सुपारीला प्रतिझाड 40 रुपये तर नारळाला प्रतिझाड 250 रुपयांची मदत राज्य शासनाने देऊ केली. याबाबत पूर्ण समाधान मानता येणार नसले तरी, या निर्णयामुळे थोडा दिलासा निश्चित मिळाला आहे, असे खा. सुनील तटकरे म्हणाले.

आधीच्या नियमात मदत दिली असती तर नारळाला 77 रुपये आणि सुपारीला 10 रुपये प्रतिझाड मदत मिळाली असती, याकडेही लक्ष वेधताना नवीन नियमाप्रमाणे आता हेक्टरी सुमारे अडीच लाख मदत मिळू शकणार असल्याने बागायतदारांना दिलासा मिळणार आहे. पूर्वीच्या सरकारच्या धोरणानुसार सर्व मिळून दोन कोटी मदत मिळाली असती. यात महाआघाडी सरकारने वाढ केल्यामुळे ती रक्कम 6 कोटी 80 लाखावर गेली. अंतिमतः ही रक्कम 12 कोटींवर गेली आहे. 5 ऑगस्टपर्यंत कुठल्याही परिस्थितीत नुकसानग्रस्तांना मदत जमा झाली पाहिजे, अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

चक्रीवादळात नुकसान झालेल्या गणपती कारखानदारांची मदत राहिली आहे. शाळा दुरुस्तीचा निधी आणण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती खा. सुनील तटकरे यांनी दिली. शाळांना जास्तीत जास्त दोन लाखांची मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून, यामध्ये खाजगी शाळांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये शटडाऊन झाल्यामुळे पेणवर धुराचे साम्राज्य पसरले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र हे कशामुळे झाले? त्याचे जनसामान्यांवर काय परिणाम होतील? याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे खा. सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here