शेकापचे कर्जत तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांचे निधन

0
3527

संतोष पेरणे/कर्जत : कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस प्रवीण पाटील यांंना झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग आणि नंतर हृदयविकाराचा झटका आल्याने 27 जुलै रोजी निधन झाले. ते 44 वर्षांचे होते.

कर्जत तालुक्यातील मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीवर 2018 मध्ये प्रविण पाटील थेट सरपंच म्हणून विजयी झाले होते. त्याआधी त्यांच्याकडे शेकाप तालुका चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मधल्या काळात त्यांनी नेरळ येथे नेरळ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली होती. तर त्यांचे आधारस्तंभ असलेले रायगड जिल्हा परिषदेचे दिवंगत सदस्य सुदाम पेमारे यांच्या रिक्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्याची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न करून सीमा सुदाम पेमारे यांना बिनविरोध निवडून दिले होते.

हुतात्मा हिराजी पाटील यांच्या कुटुंबात जन्मलेल्या प्रविण पाटील यांनी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे उपाध्यक्षपद मागील चार वर्षांपासून सांभाळत होते. शेकापचे तालुका चिटणीस म्हणून प्रभावी काम त्यांनी अल्पवधीत करून दाखवले होते. त्यामुळे शेकापचे राष्ट्रीय सरचिटणीस जयंत पाटील यांच्यापासून पक्षातील सर्व कार्यकर्ते यांचे ते जवळचे बनले होते. उद्योग क्षेत्रातदेखील त्यांनी यशस्वी काम केले. त्यातून मोठा मित्रवर्ग त्यांनी निर्माण केला होता. मागील काही वर्षे त्यांनी आपल्या कुटुंबातील हुतात्मा झालेले हिराजी गोमाजी पाटील यांच्यावर चित्रपट काढण्यासाठी वेळ दिला होता आणि तो चित्रपट जानेवारी 2020 मध्ये राज्यात प्रसिद्ध झाला होता.

11 जुलै रोजी प्रविण पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुली तसेच पत्नी यांचे कोरोना टेस्टचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर त्यांना आधी चामटोली बदलापूर येथील पोद्दार कोविड रुग्णालयात दाखल केले होते. तेथे सुधारणा दिसत नसल्याने त्यांना मुंबई मुलुंड येथील प्लॅटीनम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. 15 दिवस उपचार घेऊन कोरोनावर यशस्वी मात करीत असताना अंतिम कोरोना टेस्ट घेण्यासाठी त्यांचे स्वॅब 27 जुलै रोजी घेण्यात आले. 27 जुलै रोजी सकाळी त्यांनी नेरळ येथून जेवणाचा डब्बा घेऊन गेलेल्या आपल्या चालकासोबत चर्चाही केली होती.

कोरोना टेस्टचा रिपोर्ट आल्यावर आपल्याला लवकरच घरी सोडले जाणार, अशी आशा असताना सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. अवघ्या  वयाच्या 44 व्या वर्षी ते हे जग सोडून निघून गेले. त्यांच्या या अकाली जाण्याने अनेकांना धक्का बसला असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here