सोसाट्याच्या वार्‍यामुळे रायगडकरांच्या हृदयाचा ठोका चुकला

0
3179
file photo

पुन्हा चक्रीवादळ येणार असल्याची पसरली अफवा

अलिबाग । तीन दिवस समुद्राला उधाण येणार आहे, ही बातमी होती. मात्र रविवारी रात्रीपासून सोसाट्याचा वारा आणि पाऊस कोसळू लागल्यामुळे रायगडकरांच्या हृदयाचा ठोका चुकला. पुन्हा चक्रीवादळ येणार, अशी अफवा किनारपट्टीवर पसरली होती. मात्र प्रशासनाने चक्रीवादळ येणार नसल्याचे स्पष्ट केले आणि नागरिकांच्या जीवात जीव आला.

3 जून हा दिवस कोकण किनारपट्टी विसरु शकणार नाही. चक्रीवादळामुळे विस्कटलेले संसार अजूनही उभे राहिलेले नाहीत. झाडामाडांच्या नुकसानीचा हिशेबच नाही. सरकारची मदतही काहींना अजूनही पोहचलेली नाही. अशावेळी रविवारी श्रीवर्धनसह पलिकडे मंडणगड, दापोली तालुक्यात वादळी वारा सुरु झाला.  सोसाट्याचा वारा आणि समुद्राची वाढलेली गाज यामुळे चक्रीवादळाच्या अफवेने ठोका चुकवला.
सोमवारी (6 जुलै) सायंकाळी अलिबाग, मुरुडमध्येही सोसाट्याचा वारा सुटला होता. नुकतेच बसवलेले पत्रे पुन्हा उडून जातात की काय? अशी भीती निर्माण झाली होती. सोसाट्याच्या वार्‍यामुळे 3 जूनच्या आठवणी जाग्या झाल्या. मात्र बरसत असलेला वादळी पाऊस तासाभरानंतर थांबला आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.
चक्रीवादळ येणार असल्याचा कुठलाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला नाही. जिल्हा प्रशासनाकडूनही तशी माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही केवळ अफवाच असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here