मौजमजेसाठी ‘ते’ दोघे करायचे चोर्‍या! एक इलेक्ट्रीशिअन, दुसरा ड्रायव्हर!

0
684
पनवेल शहर पोलिसांनी चोरांकडून हस्तगत केलेली वाहने.
  • पनवेल शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
  • चोरीचे 10 गुन्हे उघडकीस
  • चोरलेल्या 4 मोटारसायकली, 4 ऑटोरिक्षा केल्या जप्त
  • टपरीचा लुटलेला मालही हस्तगत

पनवेल : मौजमजेसाठी वाहन चोरी करणार्‍या दोन विशीतील तरुणांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 10 गुन्हे उघडकीस आले असून, चोरलेल्या आठ वाहनांसह स्क्रू ड्रायव्हर, पक्कड असे इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या चोरांपैकी एक इलेक्ट्रीशिअन आहे, तर दुसरा ड्रायव्हर असल्याची माहिती पुढे आले आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑटो रिक्षा व मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडले होते. त्यानुसार हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार, पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या वाहनचोरांना जेरबंद करण्यासाठी वेगाने चक्रे फिरवली.

गुप्त बातमी व तांत्रिक तपासाच्या आधारे वाहन चोरी करणार्‍या एका चोराला 22 जुलै रोजी पनवेल येथून व दुसर्‍याला 23 जुलै रोजी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने तुर्भे येथून अटक करण्यात आली. या दोघांकडून 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. केवळ मौजमजेसाठी हे दोघे ऑटोरिक्षा व मोटारसायकल चोरायचे. गॅस किंवा पेट्रोल संपल्यानंतर हे चोरटे वाहन तेथेच सोडून देत असत. याशिवाय त्यांनी तक्का पनवेल परिसरातील पानटपरीचे लॉक तोडून सिगारेट, तंबाखू आदी साहित्य चोरले होते. हा मालही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. तसेच एमएच 06 झेड 3353 या क्रमांकाची ऑटोरिक्षाही जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे करीत आहेत.

अशोक बाळकू उताले (वय 20, धंदा – इलेक्ट्रीशिअन रा.पंचशील नगर झोपडपट्टी, नवीन पनवेल) व अभिषेक प्रकाश बोराडे उर्फ अविनाश उर्फ बटक्या (वय 20 वर्षे धंदा – ड्रायव्हर रा.चुनाभट्टी बोन्सारी गाव, तुर्भे एमआयडीसी) अशी पनवेल शहर पोलिसांनी अटक केलेल्या चोरांचे नावे आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 30 हजार रुपये किमतीच्या 4 मोटारसायकल, 4 ऑटोरिक्षा, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, सिगारेट व तंबाखू आदी माल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपुरी, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमाळे, पोलीस हवालदार विजय आयरे, नितीन वाघमारे, पोना प्रमोद शिंदे, पंकज पवार, नंदकुमार माने, गणेश चौधरी, अमरदीप वाघमारे, पोशी सुनील गर्दनमारे, म्हाळू आव्हाड, विवेक पारासूर, यादवराव घुले, राजू खेडकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here