अलिबाग तालुक्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले…

0
24682
आंबेपूर, मोठे शहापूर, कुरुळ, ब्राह्मणआळी, चेंढरे, खारीकपाडा काविर, जिल्हा शासकीय रुग्णालय वसाहत येथील रुग्णांचा समावेश

अलिबाग : अलिबाग तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आज (30 जून) तालुक्यात कोरोनाचे 23 नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने अलिबागकरांची झोप उडाली आहे.

आज नोंद झालेल्या 23 नवीन रुग्णांमध्ये आंबेपूर येथील 8, मोठे शहापूर येथील 10, आदर्शनगर कुरुळ येथील 1, खारीकपाडा काविर येथील 1, अलिबाग शहरातील सिद्धेश सोसायटी ब्राह्मणआळी येथील 1, जिल्हा शासकीय रुग्णालय वसाहत-अलिबाग येथील 1, कृष्णवाटीका चेंढरे येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.

आंबेपूर येथील 34 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, 15 वर्षीय 2 मुले, 34 वर्षीय व्यक्ती, 14 वर्षीय मुलगा, 8 वर्षांची मुलगी आणि 64 वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर मोठे शहापूर येथे आढळून आलेल्या 10 कोरोना रुग्णांमध्ये 36 वर्षीय, 38 वर्षीय दोन व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी, 36 वर्षीय महिला, 14 व 13 वर्षीय मुली, 68 वर्षीय वृद्ध महिला व 13 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.आंबेपूर आणि मोठे शहापूर येथे आढळून आलेल्या या एकूण 18 रुग्णांमध्ये जेएसडब्ल्यू कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांचा समावेश असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

जिल्हा शासकीय रुग्णालय वसाहत-अलिबाग येथील 36 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अलिबाग शहरातील ब्राह्मणआळी येथील सिद्धेश सोसायटीतील एका 25 वर्षांच्या तरुणाला कोरोना झाला आहे. चेंढरेतील कृष्णवाटीका सोसायटी येथील एका 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर आदर्शनगर कुरुळ येथील 59 वर्षीय व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. खारीकपाडा काविर येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.

दिलासा देणारी बाब म्हणजे, आज तालुक्यातील 16 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. यात पोयनाड येथील 2, हाशिवरे येथील 1, गोंधळपाडा येथील 2, मुळे येथील 6, वालवडे येथील 1, सिगल सोसायटी अलिबाग येथील 1, कोहीनूर सोसायटी अलिबाग येथील 1, चरी येथील 1 आणि वरसोली येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, आज आढळून आलेल्या 23 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 142 वर पोहोचली आहे. यापैकी सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून, 80 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 56 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here