कोलाड येथे विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

0
20988
मोटारसायकल कारला धडकल्यानंतर गाडीवरुन उड्या मारल्याने बसली टँकरची धडक….

गोवे-कोलाड । मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड येथे आज सायंकाळी झालेल्या एका विचित्र अपघातात दोन 23 वर्षीय तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पेण येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही घटना आज (1 ऑगस्ट) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडली. पवई मुंबई येथून फिर्यादी कारचालक या शीतल पंकल वाघेला (वय 34), ओम पंकज वाघेला व जान्हवी पंकज वाघेला असे वुमन पॉवर कंपनीची फोर्ड फिगो गाडी घेऊन माणगावकडे चालले होते. सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास कोलाड गावच्या हद्दीतील कोकण रेल्वे ब्रीजजवळ समोरुन येणार्‍या टँकरला ओव्हरटेक करुन येणारी मोटारसायकल त्यांच्या कारला धडकली.

मोटारसायकल चालक रसिक रामभुत निसाल (वय 17, रा. माणगाव) याने कारला समोरुन धडक दिल्यानंतर मोटारसायकलवर मागे बसलेले अक्षय विठ्ठल मरचंडे (वय 23, रा. माणगाव) व रोशन रमेश शिंदे (वय 23, रा.तिसे बौद्धवाडी ता. रोहा) यांनी बाजूला उड्या मारल्या. याचवेळी टँकरची धडक बसून अक्षय आणि रोशन यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटारसायकल चालक रसिक निसाल हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी पेण येथील म्हात्रे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे हे तातडीने सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमीला तातडीने उपचारासाठी पेणला हलविले. दरम्यान, टँकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकाने रसिक निसाल विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here