माथेरान बंद असताना शासनाकडून वाणिज्य दराने पाण्याची बिले

0
314

आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून बिले कमी करण्याचे आश्वासन

संतोष पेरणे / कर्जत : माथेरान गावातील नागरिकांना पाणी वापराबद्दल वाढीव बिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून देण्यात आली आहेत. पर्यटन व्यवसाय ठप्प असल्याने शासनाने पाणी वापराची बिले यात 100 टक्के सूट द्यावी किंवा ती बिले रद्द करून केवळ सरासरी बिले आकारावी, अशी मागणी माथेरान लॉजिंग बोर्डिंग मालक संघटनेने केली आहे.  कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यवसाय बंद असल्याने पाण्याचा वापर केलेला नाही आणि असे असताना देण्यात आलेली बिले अन्यायकारक असून आपण सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेणार, असे आश्वासन दिले आहे.

ब्रिटिशांनी शोधून काढलेल्या माथेरान या पर्यटनस्थळावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्य सरकारने 17 मार्च 2020 पासून बंद केले. तेथे बाहेरून कोणीही व्यक्ती शहारात येणार नाही आणि सर्व व्यवहार बंद राहतील, असे जाहीर केल्यानंतर चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तेंव्हापासून एकही पर्यटक फिरकला नाही. त्यामुळे दुसरे कोणतेही आर्थिक स्तोत्र नाही, शेती नाही अशा स्थितीत माथेरानची अर्थव्यवस्था कोलमडून गेली आहे.

व्यवसाय पूर्णतः ठप्प असल्याने सामान्य कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात एकही पर्यटक आला नसल्याने उन्हाळ्यातील मुख्य पर्यटन व्यवसाय नव्हता. त्यामुळे घरगुती लॉजेसमधील खोलीदेखील चार महिन्यात उघडली गेली नाही. असे असताना माथेरान शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून लॉजिंग, बोर्डिंगचा व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत लॉजधारक यांना वाणिज्य दराने पाणी वापराची बिले पाठवण्यात आली आहेत. याविरुद्ध माथेरान लॉजीग, बोर्डिंग मालक संघटना यांचे हातपाय गळून गेले आहेत.

आधीच व्यवसाय शून्य आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची मनमानी लक्षात घेता घरगुती लॉजिंग व्यवसाय करणारे यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सर्व लॉजधारकांनी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या अध्यक्षा प्रेरणा सावंत यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्यवसाय नसल्याने रूम्समध्ये राहायला कोणी आले नाही आणि असे असताना जीवन प्राधिकरणकडून पाणी वापराची बिले दिली जात आहेत.

17 मार्चनंतर आम्ही रूम्सदेखील उघडल्या नसल्याने हा अन्याय आमच्यावर होत असल्याचे निवेदन स्थानिक लॉजिंग चालक मालक संघटना यांच्याकडून नगराध्यक्ष यांना देण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष सागर पाटील यांनी या निवेदनाच्या प्रति कर्जत विधानसभा मतदारसंघचे आमदार महेंद्र थोरवे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता शानबाग यांना दिल्या आहेत. तर नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी या प्रकरणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधत जीवन प्राधिकरणकडून होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली आहे.

कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पाणी वापर बिलांबाबत आपण जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांच्याशी बोललो असून लॉजिंग, बोर्डिंगचा व्यवसाय करणारे यांच्यावर अन्याय होणार नाही, असा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.


आमच्यावर हा अन्याय असून आम्ही पाण्याचा वापर देखील केला नाही आणि एवढी बिले आली आहेत.त्यात आम्हाला वाणिज्य ऐवजी घरगुती दराने बिले द्यायला हवी होती. – सागर पाटील-अध्यक्ष, लाजिंग संघटना


शहरात चार महिन्यात एकही पर्यटक आला नाही आणि असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून वाणिज्य दराने बिल आकारावी ही खरे तर अन्यायाची भूमिका आहे.मात्र शासनाने यावर तात्काळ निर्णय घेऊन लॉक डाऊन काळातील पाणी वापर बिले रद्द करावी. –प्रेरणा सावंत, नगराध्यक्ष


आम्ही वाणिज्य बिलांबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे,त्यांनी निर्णय घेतल्यावर बिलांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ. -किरण शानबाग, शाखा अभियंता, जीवन प्राधिकरण

कोरोना चा फैलाव होऊ नये म्हणून लॉकडाऊन शासनाने घेतला आहे. मग त्या काळात माथेरान पर्यटक आले नाहीत, हे सत्य आहे आणि अशा वेळी तेथील संपूर्ण रोजगार आणि व्यवसाय बुडाला आहे. हे माहिती असतानादेखील प्राधिकरण अशी वाढीव बिले देणार असेल तर मग त्या अन्यायाला वाचा फोडली जाईल आणि माथेरानकरांना न्याय दिला जाईल.
– महेंद्र थोरवे, आमदार,कर्जत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here